एटीएम कार्ड बदलून लुट करणारी टोळी जेरबंद...

एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या टोळीला शिरपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.

Update: 2023-01-28 09:10 GMT

एखाद्या व्यक्तीला एटीएमचा वापर करता येत नाही लक्षात येताच, मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम सेंटरमधील ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून विविध बँकांचे ९४ एटीएम कार्ड, मोबाईलसह साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून राज्यातील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर १२ विविध प्रकाराचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन या संदर्भात माहिती दिली. यावेळी यातील एका आरोपीने आम्ही लोकांची कशी फसवणुक करायचो याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले.

मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये काही संशयीत इसम मुंबई पासिंगच्या वाहनाने संशयीतरित्या फिरत असल्याची खात्रिशीर माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दहिवद गावाकडे जावून संशयीत इसम व वाहनाचा शोध सुरु केला. साखर कारखान्याजवळ MH 02 BZ 3439 गाडी व त्यामधील ४ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव विचारून त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांची नावे सांगितली व यातील सर्व आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. 

संशयीत आरोपींची आणि त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता गाडीत विविध बँकांचे ९४ एटीएम कार्ड आढळून आले. ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ व त्यांच्या पथकाने केली. आता या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत आहेत. आणि या टोळीने या व्यतिरिक्त इतर कुठे असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस घेत आहेत. या तपासानंतरचं यांचे आणखी काही कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News