शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा दिवेलावणीत सहभाग होता का?

Update: 2020-04-06 11:54 GMT

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिवे उपक्रमाला पाठिंबा दिल्यामुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेता आमदार रोहित पवार यांनी काल देवघरातल्या विठूमाऊलीसमोरचा तेवता दिवा ट्वीट करून वेळ मारून नेली. विशेष म्हणजे, जितेंद्र आव्हाडांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांपर्यंत कोणाही नेत्यांनी एकतर दिवे उपक्रमात सहभाग नोंदवला नाही किंवा त्याचं प्रदर्शन केलं नाही.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन करून ५ एप्रिलला रात्री ९ वाजता आपापल्या घरात दिवे पेटवण्याचं आवाहन केलं. त्याच दिवशी, महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक विडियो प्रदर्शित करून मोदींच्या आवाहनाचा कडक शब्दांत समाचार घेतला. " आम्ही मूर्ख आहोत का?" हा आव्हाड यांचा सवाल होता. पण रोहित पवार यांच्या ट्वीटने माध्यमांना आयतं खाद्य पुरवलं व राष्ट्रवादीत बेबनाव असल्याच्या बातम्या माध्यमात झळकल्या.

वास्तविक, रोहित पवार यांनीही मोदींचं थेट समर्थन केलेलं नव्हतं. त्यांची भाषा जरतरची होती. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं, असं संदिग्ध मत पवारांनी व्यक्त केलं होतं. सोबत रोहित पवारांनी पर्यायही दिला होता. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो, असं ते पुढे म्हणाले होते.

प्रत्यक्षात स्वतंत्र असं कुठलंही दिवेलावणीचं प्रदर्शन रोहित पवारांनी केलं नाही. माझ्या देवघरातल्या विठूमाऊलींच्या समोर नित्यानियमनाने तेवत असणारा हा दिवा मला नेहमीच वारकरी संप्रदायाची शिकवण असणाऱ्या एकात्मता, समानता, सहिष्णुतेची प्रेरणा देत असतो. याच विचारांवर भूतकाळात आपला देश बांधला गेला, वर्तमानकाळात एक आहे व भविष्यातही असाच राहिल, असं ट्वीट त्यांनी काल रात्री साडेनऊला केलंय.

 

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, उर्जा मंत्री नीतिन राऊत, बाळासाहेब थोरात अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याही ट्वीटर अकाऊंटला दिवेलावणीचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केलेले नाहीत. एकंदरीत विरोधही नाही आणि प्रपोगंडाही नाही, असं धोरण ठेवत एकप्रकारे हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा यावेळच्या मोदींच्या आवाहनाला सविनय असहकारच म्हटला जात आहे.

Similar News