संगणकाने ओळखले 1100 दंगलखोरांचे चेहरे !

Update: 2020-03-12 16:44 GMT

दिल्लीतील दंगल सुनियोजित होती, फेस रिकग्निशन मार्फत संगणकाने 1100 दंगलखोरांना ओळखले असून, उत्तरप्रदेशातून आलेल्या सुमारे 300 गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केला आहे.

अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, ट्रंप यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर 22 फेब्रुवारी, 2020 रोजी सोशल नेटवर्किंग वर नवी खाती उघडण्यात आली होती व ती 26 फेब्रुवारीला खंडित करण्यात आली. पण आमच्याकडे त्या खात्यांची संपूर्ण माहिती असून, खाती बंद केलेली असली तरी संबंधित लोक कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत, असे शहा म्हणाले.

शहा यांनी दंगल हाताळण्याबाबत दिल्ली पोलिसांचे कौतुक केले. दिल्ली पोलिसांमुळे दंगल अन्य भागात पसरू शकली नाही, असा शहा यांचा दावा आहे. पोलिसांनी निवडणूक विभाग, परिवहन यांच्याकडील माहिती व दंगलीतले सीसीटिवी फुटेज यांची सांगड घालून आधुनिक तंत्रज्ञान वापरुन दंगलखोरांचे चेहरे हुडकले आहेत. चेहऱ्यात कितीही बदल केला तरी माणसाचे डोळे बोलतातच ! असे शहा यांनी संसदेत संगितले.

Similar News