जायकवाडी ९० टक्क्यांवर, मात्र मराठवाडा तहानलेलाच

Update: 2019-08-13 09:31 GMT

पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा आज ९० टक्क्यांवर पोहोचला. धरणक्षेत्रांत अपेक्षित पाऊस झाला नसला तरी मागच्या ८ ते १० दिवसांमध्ये वरच्या धरणातून मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्यानं जायकवाडी धरणातली पाणीपातळी वाढली. त्यामुळं औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असं असलं तरी मराठवाड्यातल्या इतर प्रकल्पांमध्ये मात्र अजूनही ठणठणाट आहे. ऑगस्ट महिना जवळपास अर्धा झाला असला तरी मराठवाड्यात अनेक क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जायकवाडी सोडलं तर मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमधले बहुतांश प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. नद्या कोरड्या पडल्यात. त्यामुळं ऐन पावसाळ्यातही मराठवाड्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती कायम आहे असंच म्हणावं लागतंय.

या भागासाठी जायकवाडी धरणातून पाण्याच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ८०० क्युसेक्स तर डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे. तर जायकवाडीच्या जलविद्युत केंद्रातून आपेगाव, हिरपूडी बंधाऱ्यांसाठी १५९० क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे काही भागांना तुर्तास तरी दिलासा मिळणार आहे. मात्र, संपूर्ण मराठवाड्याची तहान एवढ्यानं भागणार नाहीय.

Similar News