भ्रष्टाचाराचा 'कोरोना', व्हेंटिलेटर खरेदीत घोटाळ्याचा आरोप

Update: 2021-08-16 12:57 GMT

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर नसल्याने शेकडो लोकांचे बळी गेले. यामुळे राज्यात सरकारने व्हेंटिलेटर अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी व्हेंटिलेटर खरेदी करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला देण्यात आले होते. पण या अधिकारांचा गैरफायदा घेतला गेल्याचे आणि खरेदीत घोटाळा केला गेल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये उघड झाला आहे.

जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आली होती. पण या खरेदीमध्ये घोळ झाल्याचं समोर आलं आहे. नवजात बालकांसाठी 15 आणि प्रौढ व्यक्तींसाठी 15 असे एकूण 30 व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले होते. हे व्हेंटिलेटर रुग्णालयात दाखल देखील झाले आहेत. मात्र खरेदी करण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची कंपनी आणि किंमतीमध्ये घोळ झाल्याचं माहिती अधिकारातून उघड झाले आहे.



 


या खरेदीमध्ये जेईएम पोर्टलवर मॅक्स प्रोटॉन प्लस कंपनीच्या व्हेंटिलेटरची किंमत 12 लाख 38 हजार 431 रुपये दाखवण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात व्हेंटिलेटरचे बाजार मूल्य 5 लाख 13 एवढे आहे. नवजात शिशू आणि मोठ्या व्यक्तींसाठी 30 व्हेंटिलेटर घेण्यात आली. त्यापोटी 3 कोटी 71 लाख 54 हजार 130 रुपये एवढा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाला. पण नामांकित ब्रँण्डऐवजी दुसऱ्याच कंपनीची मशीन्स मागवण्यात आल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे 29 मे रोजी यासंदर्भातली निविदा मंजूर झाली आणि 28 जूनपर्यंत व्हेंटिलेटर ताब्यात घेऊन त्यांचा वापर सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र तसे काहीच झाले नाही.

दरम्यान कोरोना काळात आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या खरेदीचे सर्व अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन एस. चव्हाण यांना देण्यात आले होते. यामुळं त्यांचीही चौकशी होणं आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.

व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणाची चौकशी होणार - जिल्हाधिकारी

"जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 200 व्हेंटिलेटर खरेदी केली आहेत. मात्र गेल्या महिन्यात ज्या मशीन आल्या आहेत, त्याबाबत काही तक्रारी आहेत. त्यांची तज्ञ्ज समिती मार्फत चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र जेईएम पोर्टलमार्फत निविदा भरल्या असल्याने पारदर्शकता आहे," असा दावा जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला आहे.




 


मेलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्यावर कार्यवाही होईल- पालकमंत्री

"कोरोना काळात आरोग्यासाठी जे. जे. आवश्यक होतं, त्यासाठी जिल्हा सिव्हिल सर्जन तसेच डीन यांना आपण अधिकार दिले होते. जिल्हयात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा खाली करण्यासाठी आपण आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना खरेदी करण्यासाठी अधिकार दिले होते. त्यातही जर कोणी मेलेल्या लोकांचे टाळूवरचे लोणी खाणार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.

Tags:    

Similar News