उद्यापासून अजिंठा-वेरूळ लेणी सुरू होणार; पर्यटकांना मात्र परवापासून प्रवेश

Update: 2020-12-08 14:57 GMT

औरंगाबाद: गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बंद असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी बुधवारपासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र पर्यटकांना प्रत्यक्षात परवापासून म्हणजेच गुरुवारी लेणीत प्रवेश दिला जाणार आहे. औरंगाबाद येथे आज झालेल्या जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने राज्यातील पर्यटन स्थळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट होत असल्याने अनेक ठिकाणी पर्यटन स्थळ उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळ उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासनात आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन स्थळ उघडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यापासून बंद असलेल्या पर्यटन स्थळांची साफसफाई उद्यापासून केली जाणार आहे.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी सुद्धा करण्यात येणार आहे.

बुधवारी साफसफाई झाल्यानंतर गुरुवारपासून पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. यासाठी पर्यटकांना तिकिटाची ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे .त्यामुळे थेट तिकीट कुणालाही मिळणार नाही. तर पर्यटकांना प्रवेश देताना सकाळच्या सत्रात एक हजार पर्यटकांनाच आत सोडले जाणार आहे. त्यानंतर दुपारच्या दुसऱ्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच छोट्या पर्यटन स्थळ ठिकाणी फक्त पाचशे लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पर्यटन स्थळ उघडल्यानंतर गर्दी होऊ नये याची काळजी प्रशासन घेत आहे.

याबरोबरच येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटन स्थळी असणाऱ्या गाईड्स आणि पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या दुकानदारांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे.त्यामुळे कोरोना चाचणी त्या-त्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी करण्याची सुविधा संबंधित यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. तसेच पर्यटकांना मास्क आणि कोरोनाबाबतचे घालून दिलेले नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

Tags:    

Similar News