दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला

विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदा पेरणीला कधी सुरूवात करावी याबाबतची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Update: 2021-06-13 15:30 GMT

अमरावती : गेल्यावर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यामुळे मृग नक्षत्र लागले असले तरी यंदा हे दुबार पेरणीचे संकट उद्भवू नये, याकरिता 17 जूनपर्यंत पेरणी नकोच, असा सल्ला विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात यंदा 7 लाख 28 हजार हेक्टरवरील खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे बाजारात सध्या धावपळ सुरु आहे. यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या 37 टक्के म्हणजेच 2 लाख 70 हजार हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. 'कॅश क्राप' या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे आणि परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय 2 लाख 52 हजार हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे.

सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक अमरावती जिल्ह्यात हमखास होतेच, अशी स्थिती असल्याने आंतरपिकासाठी तुरीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा 1 लाख 30 हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित असली तरी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय 20 हजार हेक्टरमध्ये मुग आणि 10 हजार हेक्टरमध्ये उडीद प्रस्तावित आहे. तसे पाहता, 60 दिवसांचे हे पीक मागील पाच वर्षात शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकरी आशेवर आहेत. याशिवाय 22 हजार हेक्टरमध्ये ज्वारी, 4 हजार हेक्टरमध्ये धान, 15 हजार हेक्टरवर मक्का आणि 6 हजार हेक्टरमध्ये इतर पिके राहतील. पेरणीपूर्वी बियाणांची उगवणशक्ती तपासणी आणि बिजप्रक्रिया महत्वाची असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पेरणी कधी करावी?

जमिनीत किमान सात इंच ओल किंवा 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. बियाणे महाग आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. शेतकऱ्यांनी 15 ते 17 जूननंतरच पाऊस पाहून पेरणी करावी आणि बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी, बीजप्रक्रिया करावी. याशिवाय तीळ, तूर किंवा ज्वारी, तूर यासारखे पीकदेखील फायदेशीर ठरू शकतात. सोयाबीन सारख्या पिकाची घरच्या घरी उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी आणि आता कोणतंही पीक घेतांना बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News