अमरावती, नांदेड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस सतर्क

Update: 2021-11-15 12:44 GMT

कल्याण : अमरावती, नांदेड येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कल्याण मधील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व मस्जिद मधील जबाबदार व्यक्ती, ट्रस्टी यांची पोलीस ठाण्यात बैठक घेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मस्जिदीमधून समाज बांधवाना आवाहन करावे अशी विनंती वजा सूचना केली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी ही सूचना दिली आहे.

आपसातील वादामुळे देशात शांतता बिघडविण्याचा प्रयत्न असामाजिक तत्वाकडून केला जाऊ शकतो. यामुळे देशातील शांतता अबाधित राहावी यासाठी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेतला जाऊ नये असे आवाहन शेख यांनी केले.

या बैठकीसाठी मस्जिदी मधील मौलाना,इमाम, ट्रस्टी उपस्थित होते. दरम्यान कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कडक कारवाई करण्याचा इशारा देखील यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेख यांनी दिला.

Tags:    

Similar News