बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला भीषण आग

Update: 2021-09-13 04:31 GMT

पुण्याच्या बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. जवळपास २५ हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीत पूर्णपणे जळून नष्ट झाले आहे. ही आग इतकी भीषण होती की गोदामाचा लोखंडी सांगाड्याचे चॅनेल देखील वाकले. या आगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाले। आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए व एमआयडीसी येथील १२ अग्निशमन गाड्या आणि वॉटर टँकरला पाचारण करण्यात आले होते. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सुदैवाने वेळीच गोदामातील सर्व जण बाहेर आल्याने कोणीही जखमी झालेली नाही. 

बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्‍या बिग बास्केट या कंपनीचे हे गोदाम आहे. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या गोदामाला आग लागली. या गोदामाला लागूनच असणाऱ्या मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी देखील या आगीत जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

गावातील २ जेसीबीच्या सहाय्याने या गोदामाचे पत्रे बाजूला करुन ही आग विझविण्यात आली.

दरम्यान आग विझविण्याचे काम सुरू असताना गोदामाच्या व्यवस्थापकाने तिजोरी मोठ्या प्रमाणावर पैसे असल्याची माहिती दिली. तेव्हा अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी आत प्रवेश करुन तिजोरी बाहेर काढली. त्यामुळे तिजोरीतील ८ लाख रुपये वाचविण्यात यश आले. मात्र, टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे २ लाख रुपये जळून खाक झाले. जवळपास ३ तास ही आग सुरू होती अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

Tags:    

Similar News