एक तलाठी कमवतो कोट्यवधी !

Update: 2020-02-07 13:13 GMT

९४ पेक्षा जास्त प्लॉटधारकांना कोट्यवधींचा गंडा घालून घोटाळा करणाऱ्या तलाठ्याला बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावमध्ये अटक करण्यात आली आहे. तब्बल २ महिन्यांपासून फरार असलेल्या तलाठ्याला पोलिसांनी अटक केली. कोर्टानं त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. राजेश चोपडे असं या तलाठ्याचे नाव आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1846987898771538/?t=2

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात तलाठी राजेश चोपडे याने गृहनिर्माण सोसायट्यांना वितरित केलेल्या प्लॉटचे मूळमालक बदलून त्या जागी आपल्या मर्जीतील व्यक्तींचे नावे ऑनलाईन प्रणालीद्वारे टाकल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच शहरातील इतरही काही प्लॉटचे मूळमालक बदलून त्या प्लॉटची परस्पर विक्री केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. हा प्रकार जवळपास १७ वर्षे सुरू होता. महसूल विभागातील शासकीय दस्तावेजातही चोपडेने खाडाखोड केल्याचा आरोप आहे.

यासंदभार्त २ प्लॉटधारकांनी महसूल विभागाकडे आणि पोलिसांकडे फसवणुकीच्या तक्रारी केल्यानंतर महसूल विभागाने याची चौकशी समितीद्वारे चौकशी केली. या चौकशीत राजेश चोपडे हा दोषी आढल्यानंतर त्याला निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार ५ डिसेंबरला त्याला निलंबित करण्यात आले. तर तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यामार्फत पोलिसांत ८ जानेवारी रोजी राजेश चोपडेविरोधात ९४ प्लॉटच्या व्यवहारात गैरप्रकार आणि शासकीय कागदपत्रांमध्ये खाडाखोड केल्याची तक्रार दिली होती. तर अजूनही चोपडेंच्या कार्यकाळातील प्लॉटच्या व्यवहारांची चौकशी सुरु असून याची व्याप्ती फार मोठी असल्याची शक्यता तहसीलदारांनी व्यक्त केली आहे. ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांनी राजेश चोपडेच्या मालमत्तेबाबत चौकशीची मागणी केलीय.

महसूल विभागाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निलंबित तलाठी राजेश चोपडे विरुद्ध कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हे दाखल झाल्यापासून ही तलाठी राजेश चोपडे हा फरार होता. पोलिसांनी पथकं तयार करून त्याचा शोध सुरू केला होता. पण शुक्रवारी खामगाव शहरात फिरताना त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून फसवणूक झालेल्या प्लॉट मालकांना न्याय द्यावा आणि घोटाळेबाजांना शोधून कारवाईची मागणी ते करत आहेत.

Similar News