मुंबईत कोरोना योद्धे झोपतायत फूटपाथवर...

Update: 2020-05-09 10:47 GMT

मुंबईत कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. सरकारनं पोलिसांच्या मदतीला राज्य राखील दलाच्या तुकड्याही तैनात केल्या आहेत. सोलापूर 'एस.आर.पी. कॅम्प' मधील एक तुकडीही 'कोरोना वॉरियर्स' म्हणून मुंबईत दाखल झालीय. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोलापूरच्या शंभर जवानांना फुटपाथवरच झोपावे लागत आहे. हा धक्कादायक प्रकार घडतोय तोही मुंबई पोलीस आयुक्तालयासमोरच्याच फूटपाथवर...

गृह विभागाच्या आदेशानुसार सोलापूरमधून शंभर जवानांची एक तुकडी मंगळवारी रात्री मुंबईसाठी निघाली. बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी रिपोर्ट सादर केला. पण 'तुम्ही खूप उशीर केला, असं सांगत एका पोलिस अधिकाऱ्यानं त्यांना कुठे बंदोबस्ताला जायचे आहे तेही सांगितले नाही आणि राहण्याची-जेवणाची सोयदेखील केली नाही अशी या जवानांची तक्रार आहे.

उलट कोरोनाच्या काळात शंभर जवान बाहेरून आले आहेत' या भीतीपोटी कोणत्या वस्तूलाही त्यांना हात लावू दिला गेला नाही. एवढंच काय गेल्या दोन दिवसांपासून शौचालयासाठीही या जवानांची भटकंती सुरू आहे. घरातून निघताना सोबत घेतलेल्या डब्यांवर त्यांनी तीन दिवस काढलेत. मुंबईतलं लॉकडाऊन अत्यंत कडक केल्यामुळे बाहेरही कुठे खाण्यास मिळत नाही. सकाळी फक्त भाजीवाल्याकडून स्वतःच्याच पैशानं भाजी घेऊन तीही कच्ची खावी लागतेय. पिण्याच्या पाण्यासाठीही या जवानांना वणवण फिरावं लागतंय.

Similar News