गांधींवादाचा मार्ग दाखवत राज्यभर फिरलेली ‘विश्वमैत्री सायकल यात्रा’

Update: 2019-10-02 07:28 GMT

विविध जाती, जमाती आणि धर्मात एकत्र नांदणारा आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक, क्रांतीकारक नेते यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने लढा दिला. तेव्हा देशात स्वातंत्र्य उदयास आले. त्यासोबतच संविधान अंगीकृत करून लोकशाहीची मुल्ये रूजवली. हा ठेवा जपणे आणि पुढच्या पिढीकडे तो सुरक्षितपणे हस्तांतरित करणे गरजेचे आहे.

आज देशात स्वातंत्र्य, लोकशाही, धर्म, राष्ट्रवाद या विषयी गैरसमज पसरविले जात आहेत. राष्ट्रीय नेत्यांवर गलिच्छ भाषेत टिका केली जात आहे. लोकांमध्ये जात, धर्माच्या नावावर भांडणे लावली जात आहेत. यातून तरूण पिढी भरकटली जात आहे. यामुळे समाजात शांततेचा भंग होत आहे. महात्मा गांधींनी नवखालीमध्ये राहून हिंदू-मुस्लिम दंगलीचे शमन केले. तेथे शांतता प्रस्थापित केली. हे अतिशय अवघड कार्य त्यांनी करुन दाखवले. म्हणून त्यांना "वन मॅन आर्मी" अशा शब्दात गौरविण्यात आले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी समाजात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून "शांती दल" स्थापन केले. तरूणांपुढे शांतीचा संदेश देणाऱ्या सायकल यात्रेची संकल्पना मांडली. त्याबाबत युवकांना आवाहनही केले. शांततेच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या काही तरूणांनी यासाठी कटिबद्ध राहुन कार्य करण्याचे ठरविले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने बापू १५० जयंतीनिमित्त "विश्वमैत्री सायकल यात्रेचे" आयोजन केले. १४ नोव्हेंबर २०१६ मध्ये सुरू झालेल्या या यात्रेचे प्रतिनिधित्व नितीन सोनवणे हा युवक करत आहे. आज तो युरोपमध्ये पोहचला असून तो महात्मा गांधींनी दिलेला शांतीचा संदेश देत जगभर फिरत आहे. तेथील जनता त्याचे आनंदाने स्वागत करीत असून त्यास शुभेच्छाही देत आहे.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने "द्वेष छोडो, देश जोडो" यासाठी कस्तुरबा भवन नागपूर ते गांधी भवन पुणे यादरम्यान सायकल यात्रेचे महाराष्ट्र पातळीवर आयोजन केले आहे. या यात्रेचे नेतृत्व तुषार झरेकर हा युवक करतोय. १५ सप्टेंबर २०१९ रोजी कस्तुरबा भवन नागपूर येथून सुप्रसिद्ध लेखिका, समाजसेविका श्रीमती अरुणा सबाणे यांनी हिरवा झेंडा दाखवून शांती यात्रेचा शुभारंभ केला. या यात्रेत तुषार झरेकर (पुणे), अतुल नंदा (अहमदनगर), अविनाश दरेकर (राजगुरुनगर), महेश पाटील (जळगाव), विष्णू बदाले (परभणी), अनिल बुर्डे (आळंदी देवाची), वेदांती चव्हाण (रायगड), ऋतूजा पुकाळे (सोलापूर) हे तरुण सहभागी झाले आहेत.

Full View

Similar News