शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार वाचवण्यासाठी वारसदार सरसावले, रायगडमधून घातली महाराष्ट्राला साद

महाराष्ट्रात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. जातीय आणि धार्मिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार वाचवण्यासाठी त्यांच्या वारसदारांनी रायगडच्या पवित्र भुमीतून एल्गार पुकारला आहे. हाच विचारांच्या वारसदारांचा एल्गार नक्की पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर....

Update: 2023-06-17 16:13 GMT

आपलं राजकारण करण्यासाठी देशात धार्मिक आणि जातीय दुहीची बीजं पेरली जात आहेत. एवढंच नाही तर मानवतेचा विचार जगासमोर मांडणाऱ्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा घाट घातला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार वाचवण्यासाठी वारसदार पुढे सरसावले आहेत. तसेच त्यांनी रायगडाच्या पवित्र भुमीतून मॅक्स महाराष्ट्रने आयोजित केलेल्या परिसंवादात आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे तथागत बुध्दांचे वारसदार आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यामुळे या देशाची विचारसरणी ही समता आणि समानता या दोनच तत्वांवर आधारित आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी ही हिंदूत्ववादी असल्याची दाखवण्यात येते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या धर्माचे नाही तर रयतेचे राज्य निर्माण केले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महारांच्या विचारांचे स्वराज्य स्थापन केले, असं मत राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले.

तसेच पुढे बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले, देशातील मीडिया ही मनूवादी मीडिया आहे. त्यामुळे आमच्यावर होणाऱ्या अत्याचाराला केवळ 75 सेकंदसुध्दा वेळ दिला जात नाही. एवढंच नाही तर RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द होणाऱ्या आशयाचं नियंत्रण करण्यासंदर्भात वक्तव्य केलं. त्यामुळे अशा प्रकारे माध्यमांना नियंत्रण केले जात असताना आपण आपले वंचितांचा मीडिया उभा केला पाहिजे. कारण जो समाज आपल्या महामानवाच्या जयंतीसाठी 2100 कोटी खर्च करू शकतो. तो समाज आपलं प्रतिबिंब उमटवण्यासाठी आणि आपला मीडिया का उभा करू शकत नाही?, असा सवालही यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थित केला.

Full View

यानंतर बोलताना रायगडचे खासदार सुनिल तटकरे म्हणाले, अलिकडच्या काळात ज्या पध्दतीने भाषणं केली जात आहेत. समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्याचे काम केले जात आहे. मात्र स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की, या देशाने अनेक सत्तांतरं अनुभवली आहे. त्यातील काही शांततेच्या मार्गानेही झाले आहेत. मात्र त्यापुढची गोष्ट म्हणजे रवींद्र आंबेकर यांनी सांगितले की, लोकशाहीचा चौथ्या स्तंभाला कुठेही अधिकृत मान्यता नाही. पण चौथा स्तंभ कुठेही अधिकृत नसला तरी भारत स्वतंत्र झाल्यापासून त्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कुणी नाकारत असलं तरी पत्रकारिता ही लोकाशाहीचा चौथा स्तंभच आहे. यावेळी सुनिल तटकरे म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रावर बोलताना मला जपून बोलावं लागेल. एकवेळ युवराज छत्रपती संभाजीराजे बोलू शकतील, आनंदराज आंबेडकर बोलू शकतील, राजरत्न आंबेडकर बोलू शकतील, पण मला बोलताना पक्षीय मर्यादा आहेत. माझ्यात बोलण्याचं धाडस नाही, अशातला भाग नाही. मात्र तरीही मला मर्यादा असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक लढाईसाठी घटना दिली. त्यासाठी माध्यमांना स्वातंत्र्य दिलं. मात्र त्यावर बंधन आणण्याचं काम सुरु असल्याने आता मोठ्या ताकदीने याचा सामना करावा लागणार आहे, असंही सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.

या देशात सध्या वैचारिक लढाई सोपी राहिली नाही. कारण एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी याच भुमीतून लढाई लढली होती. डॉ बाबासाहेबांनी याच भुमीतून समाजासाठी लढाई लढली होती. आता सुध्दा महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी याच भुमीतून ही लढाई लढावी लागणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

चौथा खांब कोसळला तर घर कोसळेल- आनंदराज आंबेडकर

यावेळी आनंदराज आंबेडकर म्हणाले, पिढ्यान पिढ्यापासून एक ब्राम्हणी वर्ग दलितांचे शोषण करत आहे. त्यांनी महापुरुषांना जातीत अडकवलं. एवढंच नाही तर ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मासाठी काम केलं. पण आज बाबासाहेबांना हिंदू विरोधी ठरवलं आहे. त्याबरोबरच हिंदूंना सणांचे गुलाम केलं आहे आणि लोकशाहीला सुरुंग लावला जात आहे. त्यामुळे जर माध्यम नावाचा चौथा खांब टिकला नाही तर घर कोसळू शकतं. त्यामुळे लोकशाही वाचवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

महापुरुषांच्या राज्यात शाहू महाराज गायब

महाराष्ट्र हे शाहू, फुले आंबेडकर यांचे राज्य हे असे म्हटले जाते. पण या शाहू, फुले आंबेडकर यांच्या राज्याच्या मंत्रालयातून शाहू महाराज, महात्मा फुले यांचे फोटो गायब आहेत. अनेक सरकारी कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो गायब असतात. त्यामुळे महापुरुषांच्या राज्यात महापुरुष गायब असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मात्र दुसरीकडे या महापुरुषांच्या विचारांवर चालणाऱ्या माध्यमांचा आवाज दाबण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळे याविरोधात आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. जातीय आणि धार्मिक वातावरण चेतवण्याचे काम काही माध्यमांकडून केलं जात आहे. त्यामुळे महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी आपल्या सगळ्यांना पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असं मत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमावेळी पाहुण्यांचे स्वागत महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे प्रमुख धम्मशील सावंत यांनी तर प्रास्ताविक मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग्यश्री पाटील यांनी केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


माध्यमांचा आवाज दाबला जात असताना त्याविरोधात बोलणाऱ्या कलम के सिपाही काय म्हणतात पहा....

Full View

Tags:    

Similar News