विरोधकांची झोप झाली का?

Update: 2017-03-24 09:21 GMT

शेतकऱ्यांबाबत सरकार किती संवेदनशील आहे हे गुरूवारी मंत्रालयात घडलेल्या प्रकारावरून स्पष्ट झालंय. पण, शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करून स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणारे विरोधक सुद्धा किती ढोंगी आहेत हे पण उघड झालं आहे.

मंत्रलयात रामेश्वर हरिभाऊ भुसारे या शेतकऱ्याला गुरूवारी पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर हा शेतकरी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेला. रितसर तक्रार नोंदवली. पोलीस त्याला मीडियाशी बोलण्यापासून मज्जाव करत होते. प्रकरण दाबत होते. तेव्हा विरोधी पक्षाचे नेते आणि आमदार जवळच्याच विधानभवनात झोपा काढत होते. या शेतकऱ्याच्या बाजून धाव घेण्याची तसदी एकाही विरोधपक्षाच्या नेत्याला किंवा आमदाराला घेता आली नाही. खरंतर विधानपरिषदेचं कामकाज दुपारीच संपलं होतं. निम्म्या आमदारांना बराच वेळ होता. पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कामकाज बंद पाडणारे हे आमदार या शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर ढिम्मच होते. एकालाही वाटलं नाही की पोलीस ठाण्यात जावं.

खरंतर हाकेच्या अंतरावर एवढा गंभीर प्रकार घडल्यानंतर विरोधीपक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेणं अपेक्षित होतं. पण, या सर्वांना त्यासाठी वेळच नव्हता, कारण सर्वांच लक्ष लागलं होतं ते भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे. सरकार जातं की राहतं याकडेच सर्वांच लक्ष होतं. अख्खी रात्र त्यात घालवल्यानंतर सकाळ झाली आणि विरोधीपक्षाच्या आमदारांना जाग आली. सर्व जण मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहचले. घडल्या प्रकारावर चर्चा केली. यावरूनच लक्षात येतं की विरोधीपक्षांची शेतकऱ्यांबाबतची संवेदनशीलता किती बोगडी आहे ते.

नीलेश धोत्रे

 

Similar News