वांद्रे ते दादर व्हाया कार्यकर्ता

Update: 2017-02-25 06:19 GMT

२३ फेब्रूवारी २०१७...राज्यातल्या महापालिकांच्या निकालांचा तो दिवस..तो दिवस काही खासच म्हणावा लागेल. राज्याचं राजकीय समीकरण ठरवणारा, शिवसेनेची राजकीय वाटचाल, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व..याची कसोटी लावणारा तो दिवस..तर, केंद्रातल्या निर्विवाद सत्तेनंतर, राज्यात देवेंद्रयुग येणार का..याची उस्तूकता ताणणारा हा दिवस..१० महापालिकांचे निकाल येणार होते, पण सर्वांचं लक्ष होत..देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईकडे..

मुंबई देशाची आर्थिक नाडी…ही नाडी २५ वर्ष शिवसेनेच्या हातात होती...भाजप तसा मुंबईत छोटा भाऊ..पण, पारदर्शकता, आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर युती तूटली..आणि २५ वर्षांचा संसार मोडून सेना-भाजप वेगळे झाले. त्यामुळे ही निवडणूक उद्धव आणि देवेंद्र यांच्यासाठी प्रतिष्ठेची.

दिवसाची सुरूवात झाली. सकाळचे 9 वाजले होते आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बहुमत मिळण्याचा दावा केला. मातोश्री, देशातल्या राजकारणाचं केंद्रस्थान अशी ख्याती असलेलं बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान. मातोश्रीवर शुकशुकाट होता. कार्यकर्ते आणि नेते उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा करत होते. तर, दादरच्या वसंत स्मृतीचीही म्हणजे भाजप कार्यालयाची तीच अवस्था.

मातोश्री

मतमोजणीला सुरूवात झाली..मुंबईच्या काना-कोपऱ्यातून कल येवू लागले. शिवसेनेनं आघाडी घेतली होती, पण भाजपही शिवसेनेला सोडायला तयार नव्हती. शिवसेने पाठोपाठ भाजपचे आकडेही वाढत होते. घड्याळाचे काटे जसे पुढे सरकत होते, तसे प्रत्येक सेकंदाला आकडे बदलत होते. पहिल्या तासात, शिवसेना-भाजपच्या आकड्यांमध्ये फारसा फरक नव्हता, पण दोन तासांनी मात्र चित्र बदललं.

शिवसेनेनं आघाडी घेतली, आणि शिवसेनिकांमध्ये उत्साह संचारला. शुकशुकाट असणा-या मातोश्रीबाहेर अचानक नेते कार्यकर्त्याची वर्दळ सुरू झाली. भाजपची कशी जिरवली, धोकेबाज भाजपला कसा चांगला धडा शिकवला, मुंबईचे राजे आम्हीच, मुंबई आमचीच. कळली का नाही आता त्यांना त्यांची औकात. असं म्हणत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मातोश्रीबाहेर जणू नवं चैतन्य निर्माण झाल्यासारखं होतं. कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला होता, सेनेच्या काही अती-उत्साही नेत्यांनी मग भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यासाठी कार्टूनदेखील काढलं. पण, सेनेच्या या कार्यकर्त्यांचा हा उत्साह जास्तकाळ टिकला नाही.

दुपारच्या प्रहरात भाजपनं पुन्हा चांगली मुसंडी मारली. भाजपचे आकडे वाढत होते, शिवसेनेचा आकडा थांबला, आणि हळुहळु मागे येताना दिसू लागला. म्हणतात वासे फिरले की सर्वकाही फिरतं. एव्हाना सेना नेत्यांना कळून चुकलं, पुन्हा मातोश्रीवर शुकशुकाट. बंदोबस्ताला असलेले पोलीस, मीडियाचे प्रतिनिधी सोडले तर एकही शिवसेनेचा कार्यकर्ता दिसत नव्हता. मातोश्रीवर सन्नाटा असल्यासारखं होतं, तर दादरमध्ये मात्र भगवं वादळ पहायला मिळालं.

भाजप कार्यालय

भाजप कार्यालयाबाहेर नेते, कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली. नेते मंडळी पोहोचले, आणि मग काय ढोल ताशांच्या गजरात नेते कार्यकर्ते थिरकू लागले. एकमेकांचं तोंड गोड करू लागले. शिवसेनेच्या फक्त तीन सीट मागे येवून भाजप पोहोचली. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचं बळ संचारलं. मुंबईतील सत्तेचं केंद्र आता वांद्रे नाही, तर दादर आहे असं काहीकाळ मनात येवून गेलं.

मुंबईच्या जनतेनं आपला कौल दिला. चित्र स्पष्ट झालं आणि नेत्यांनी पुन्हा आपली पोपटपंची सुरू केली. शिवसेना-भाजप कोणालाच स्पष्ट बहुमत नव्हतं. त्यामुळे प्रचारात केलेले आरोप-प्रत्यारोप विसरायचे असतात. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो. सत्तेसाठी जुळवा-जुळव करावी लागते. नेत्यांची भाषा ऐकून कार्यकर्ते चक्रावून गेले..

विजयाला पेठा चाखण्याअगोदरच नेत्यांनी पेढ्यात जमालगोटा टाकल्यागत कार्यकर्त्यांचे चेहरे पाहायला मिळत होते. आम्ही घाम गाळला, दिवस-रात्र एक केली. आणि नेत्यांनी पुन्हा युतीचे संकेत दिल्याने शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते नाराज दिसत होते. युती करायची होती मग काय झक मारायला वेगळे झालो. अशी खंत कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली. तर, यार हे होणारच होतं, आपण उगाच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. आता काय पुन्हा गळ्यात-गळे असा तीव्र संताप कानावर पडत होता.

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांनी युती करू नये, आकडे जुळत नसतील तर विरोधात बसावं. उद्धव साहेबांनी सत्तेसाठी लाचार होवू नये.. शी एका कार्यकर्त्यांने त्याच्या मनातली भाजपबाबतची चीड बोलूनही दाखवली.

एकूणच, सत्तेसाठी नेतेमंडळी काहीही जुळवा-जुळव करोत. नेते त्यांचे मनभेद विसरूनही जावोत. पण, कार्यकर्ते बहुदा हे विसरणार नाहीत.

Similar News