मजमोजणी 'घोटाळा' उघड!

Update: 2017-03-04 10:05 GMT

मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या जवळपास बरोबरीच्या जागा मिळाल्या. दहा पैकी आठ महानगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकला. मतमोजणीदरम्यानच ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याचा आरोप सुरू झाला आणि सगळीकडे गोंधळ उडाला. नाशिकमध्ये अचानक भाजपने मुसंडी कशी मारली हा प्रश्नही अनेकांना सतावू लागला. पण भाजपच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण होतं. मुंबईमध्ये अपेक्षित निकाल येत नव्हता. टीव्ही चॅनेल्सवरच्या आकडयांमध्ये मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये जवळपास ३० जागांचं अंतर दिसत होतं. मॅक्समहाराष्ट्र टीम ने या तफावतीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं की राज्याच्या एका मोठ्या न्यूजचॅनेल कडून हा मतमोजणी घोटाळा करण्यात आला.

का केला मतमोजणी घोटाळा?

इतर चॅनेल्सच्या तुलनेत आपलेच रिजल्टस कसे फास्ट आहेत हे दाखवण्याच्या नादात प्राथमिक कल आल्यानंतर या चॅनेलवर शिवसेनाच मुंबईत जिंकणार असं गृहीत धरून कोण किती पुढे याचा अंदाज बांधून कल अपडेट केले. वास्तविक मुंबई महापालिकेची कल दाखवणारी यंत्रणा काही काळानंतर सुस्त झाली, आणि अधिकृत आकडे मिळण्याची बोंब झाली. अशावेळी तोकड्या आणि अनुभवशून्य रिपोर्टर्सच्या भरवश्यावर राहिलो तर समस्या होईल हे लक्षात येताच मॅन्युअली स्कोअर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही काळ हा जुगार नीट चालला, पण नंतर गडबड होतेय हे लक्षात आल्यावर थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनच या वाहिनीला रिजल्ट चुकतोय असं सूचित करण्यात आल्याचं, याच वाहिनीत काम करणाऱ्या एका पत्रकाराने सांगीतलं. त्यानंतर या वाहिनीने हळूहळू भाजपच्या जागा ५-५ सीटस नी वाढवायला सुरूवात केली. शिवसेनेच्या १-१ जागा टप्प्याटप्प्याने कमी करायला सुरूवात केली.

घोटाळ्यांची मालिका

या वाहिनीने मतमोजणी घोटाळा केल्यानंतर ज्यांच्याकडे स्वत:कडे स्वतंत्र यंत्रणा नसलेल्या किंवा आपणही का मागे राहा या भयाने इतर वाहिन्यांनी ही या मतमोजणी घोटाळा करणाऱ्या वाहिनीला फॉलो करायला सुरूवात केली. आणि सर्वच चॅनेल्सवर एकसारखे रिजल्ट दिसायला लागले.

वास्तविक या घोटाळ्यामुळे झालं काहीच नाही, पण राजकीय कार्यकर्त्यांची धडधड मात्र वाढली होती. अस्मिता आणि विजयाच्या जल्लोषाच्या उकळ्याही वाढल्या होत्या. खरे निकाल आल्यानंतर मात्र सर्वच वाहिन्यांनी आपले अंदाज कसे बरोबर होते हे सांगायला सुरूवात केली.

Similar News