बडोलेंचा गरिबांच्या शिष्यवृत्तीवर डल्ला

Update: 2017-09-07 07:04 GMT

महाराष्ट्रात सर्वात गरजू कोण आहेत, याचा शोध घ्यायचा असेल तर राज्य सरकारने या प्रश्नाचा उत्तर आपल्याला मिळवून दिले आहे. राज्य सरकारनुसार संपूर्ण महाराष्ट्रात गरजू, वंचित घटक हे मंत्रालयात आहेत. बाकी तुम्हाला राज्यात इतरत्र गोरगरीब, गरजू, वंचित घटक दिसत असले तरी त्यांच्यापेक्षाही वंचित घटक मंत्रालयात असल्याचा शोध राज्य सरकारने लावला आहे. राज्य सरकारने हे सिद्ध करण्यासाठीच सामाजिक न्याय विभागाची शिष्यवृत्ती देताना मंत्री, सचिव या वंचितांच्या मुलांचा प्राधान्याने विचार केला आहे.

अनुसूचित जातीच्या गरीब विद्यार्थ्यांना परदेशात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले, या खात्याचे सचिव दिनेश वाघमारे यांचा मुलगा अंतरिक्ष आणि तंत्रशिक्षण सहसंचालक दयानंद मेश्राम यांचा मुलगा समीर यांचा समावेश आहे.

राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुतीची इंग्लंडमधील मॅंचेस्टर विद्यापीठात पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली तिला तीन वर्षांकरता शिष्यवृत्ती मि़ळणार आहे. अंतरिक्ष दिनेश वाघमारे याची अमेरिकेमधील पेनिसिल्वेनिया विद्यापीठात एम.एस्सी आणि समीर दयानंद मेश्राम याची वॉशिंग्टन विद्यापीठात एम.एस्सी. अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. या दोघांना दोन वर्षे शिष्यवृत्ती मिळणार आहे.

पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी जागतिक क्रमवारीतील पहिल्या ३०० परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी संस्थांमध्ये प्रवेश घेता येत नाही. अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाने २००३ मध्ये परदेश शिष्यवृत्ती योजना लागू केली. मात्र, त्याचा फायदा गरजू व गरीब विद्यार्थ्यांना होण्याऐवजी मंत्री आणि सचिवांच्या मुलांनाच होत असल्याचे पात्र विद्यार्थ्यांच्या यादीवरून दिसून येते.

आपल्या मुलीला गुणवत्तेनुसारच शिष्यवृत्ती मिळाली असल्याचा दावा राजकुमार बडोले यांनी केला आहे. मात्र बडोले हे विसरत आहेत की नियमांशिवाय नैतिक जबाबदारीही महत्वाची असते. बडोले यांच्या मुलीने दोन वर्ष लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. याचाच अर्थ त्यांची परदेशी शिकवण्याची आर्थिक क्षमता आहे. तरीही सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ घेणे म्हणजे एखाद्य गरीब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्याचा लाभ घेण्याचा प्रकार आहे.

Similar News