प्लास्टीक कचऱ्यापासून डीझेल निर्मिती

Update: 2017-03-16 18:40 GMT

चिनी शास्त्रज्ञांनी प्लास्टिकपासून डिझेल बनवण्याच्या एका नवीन आणि विस्मयकारक प्रक्रियेचा नुकताच शोध लावला आहे.

जगभरात प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासंबंधी युद्धपातळीवर संशोधन सुरु असताना हा एक क्रांतिकारी असा शोध म्हणावा लागेल. पर्यावरणाचे नुकसान होऊ न देता प्लास्टिकची विल्हेवाट लावणे ही एक मोठी डोकेदुखी होऊन बसलेली आहे. तसेच प्लास्टिकची अनियंत्रित निर्मिती आणि अतिवापरातून निर्माण झालेल्या प्लास्टिक घनकचऱ्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला भयंकर धोका जाणवतोय.

यावरच मात करण्यासाठी चीनी रसायनशास्त्रज्ञ या अतिमहत्वाच्या शोधापर्यंत येऊन पोहोचलेत. या प्रक्रियेमध्ये प्लास्टिकला म्हणजेच पॉलिइथेलीनला १५० डिग्री तापमानामध्ये तापवून त्यामध्ये ओर्गानोमेटॅलिक कॅटॅलिस्ट म्हणून ‘इरॅडीयम’ हा धातू मिसळला जातो. (या प्रक्रियेमध्ये दुर्मिळ आणि अतिमौल्यवान असलेला इरॅडीयम हा धातू कॅट्यालिस्टची महत्वाची भूमिका बजावतो ) इरॅडीयम, पॉलिइथेलीनच्या मजबूत अणुसाखळीला कमजोर करतो आणि त्याचे रुपांतर डिझलमध्ये व्हायला सुरवात होते.

“सायन्स अॅडवांन्सेस” या जगात प्रतिष्ठीत मानल्या गेलेल्या सायन्स जर्नलमध्ये याबाबतचा रिपोर्ट प्रकाशित झाल्या नंतर प्रकल्प प्रमुख झेंग हुआंग आणि त्यांच्या टीमची जगभरात प्रशंसा होत आहे. पण, झेंग हुआंग यांना सध्यातरी या प्रक्रिये एक वेगळीच समस्या भेडसावत आहे. ती म्हणजे या प्रयोगाचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा झाल्यास मोठी साखळी प्रक्रिया निर्माण करावी लागेल आणि त्याकरिता प्रचंड भांडवल आणि इरॅडीयम हा धातू लागेल. पण या धातूची कमतरता आहे. तसंच तो महाग आहे. त्यामुळे इरॅडीयमला स्वस्त आणि सहज उपलब्ध असा पर्याय शोधण्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत.

सध्या हा प्रयोग प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक बॅग्स, आणि खाद्य पदार्थावरील प्लास्टिक रॅपेर्स वर प्रक्रिया करण्यात यशस्वी झाला आहे.

  • जयश्री इंगळे

Similar News