टी.व्ही. ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

Update: 2017-03-01 18:02 GMT

झी 24 तास (रोखठोक)

झी 24 तासच्या रोखठोकमध्ये बुधवारी कोण देशप्रेमी? आणि देशद्रोही? याविषयावर चर्चा करण्यात आली. गुरमेहर कौरचा व्हीडीओ, रामजस कॉलेज आणि पुणे विद्यापीठ अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चेत अभाविपचे पुणे महानगरमंत्री प्रदीप गावडे, एसएफआयचे पुणे उपाध्यक्ष सोमनाथ निर्मल, ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर, जेएनयूचे प्राध्यापक मिलिंद आव्हाड हे सहभागी झाले होते. गुरमेहर कौरनं घेतलेली भूमिका देशद्रोही आहे, असं अभाविपला अजिबात वाटत नाही. त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आम्ही सन्मान करतो. त्यांना बलात्काराची धमकी देणा-यांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सर्वप्रथम आम्हीच तक्रार केली, असं प्रदीप गावडे यांनी सांगितलं. तर हे अभाविपचं कातडीबचाव धोरण आहे. गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींच्या देशात शांततेचा संदेश देण्याचं काम गुरमेहर करतेय. तिच्या समर्थकांना पाकिस्तान प्रेमी म्हणून देशाबाहेर हाकलण्याची भाषा करणं भाजपच्या मंत्र्यांना शोभत नाही, असा मुद्दा सोमनाथ निर्मल यांनी मांडला. दिल्लीच्या रामजस महाविद्यालयात उमर खलीदला भाषणाला निमंत्रित केल्यानं हा सर्व वाद सुरू झाल्याकडं अरूण करमरकर यांनी लक्ष वेधलं. गुरमेहरच्या एका ट्वीटमुळं देशाची एकात्मकता धोक्यात येईल, असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचं गुन्हेगारीकरण सुरू झालंय. युद्ध नको, बुद्ध हवा, हाच संदेश गुरमेहरनं दिला असून, त्यावर विद्यापीठ परिसरात चर्चा व्हायला हवी. कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणणं लोकशाहीच्या हिताचं नाही, असं मिलिंद आवाड यांनी स्पष्ट केलं.

 

साम (आवाज महाराष्ट्राचा)

साम मराठीच्या आवाज महाराष्ट्रमध्ये बुधवारी बैलगाडा शर्यतीवर चर्चा झाली. यामध्ये कृषी, संस्कृती, गोवंश संवर्धन हेच मुद्दे आहेत की यामागे केवळ मतांचं गणित आहे यावर मान्यवरांनी मतं मांडली. या चर्चेमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील, गाडीमालक शेतकरी, निर्बंध हटण्याची मागणी करणारे याचिकाकर्ते, प्राणीमित्र गौरव क्षत्रीय, शेखर जोशी सहभागी होते. जलीकट्टूचा आदर्श घेत महाराष्ट्रातील आंदोलन अधिक आक्रमक करु, असं शेतकरी नेते म्हणत आहेत, तर धनदांडग्यांच्या मौजेसाठी प्राण्यांना ईजा पोहचवणं चूक असल्याचं प्राणीमित्रांनी म्हटलंय.

 

टीव्ही 9 मराठी (बोल महाराष्ट्रा)

टीव्ही 9 मराठीच्या बोल महाराष्ट्रा या टॉक शोमध्ये, होळीनंतर दंगल? या विषयावर चर्चा झाली. त्यात भाजपचे खासदार अमर साबळे, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, जेष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत हे सहभागी झाले होते. राज्यात सातत्यानं यश मिळत असल्यानं भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप राज्यात नंबर वन ठरलीय. त्यामुळे कधीही निवडणूक होऊ द्या स्वबळावर सत्तेत येणारच असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला. राज्यातली जनता खोट्या आश्वासनांना फसली आहे. ही फसवणूक त्यांना कळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र तर सोडाच पण त्यांचा आधी यूपीतही काय निकाल लागतो, ते पाहा या शब्दांत निलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केलीय. तर उत्तर प्रदेशमध्ये लागणारे निकाल हे दूरगामी ठरतील. या निकालांवर देशाचं पुढील राजकारण अवलंबून आहे. तसंच त्या निकालांचे राज्याच्या राजकारणावरही परिणाम होऊ शकतात असं मत भरतकुमार राऊत यांनी व्यक्त केलं.

 

Similar News