मंत्र्यांच्या 'चेक सोहळ्या'चा कामगारांना फटका

Update: 2019-02-23 10:14 GMT

कामगार कल्याण विभागातर्फे कामगारांना सुरक्षा साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात भाजपाच्या माजी नगरसेवकाने जाळून घेण्याच्या प्रयत्न केल्यानंतर राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाच-सहा कामगारांना चेक आणि साहित्याचं वाटप करून निघून गेले. मंत्री जाताच या कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी घातलेल्या गोंधळामुळे कामगारांना रात्री उशीरापर्यंत साहित्यासाठी झगडावं लागलं. अनेक कामगारांना आजही साहित्य मिळालं नसल्याने कामगारांना मोठा फटका बसला आहे.

कामगारांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम इतक्या मोठ्या पातळीवर घेण्याची गरज नसतानाही, सर्वच कार्यक्रमांना राजकीय आणि सार्वजनिक स्वरूप देण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांमुळे कामगारांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला आहे.

भंडारा जिल्ह्या मध्ये 30 हजार कामगारांची नोंदणी झाली असून अद्यापही ही नोंदणी सुरूच आहे. यापैकी 7 हजार कामगारांना सुरक्षा साहित्य वाटपासाठी बोलवण्यात आलं होतं. वास्तविक, इतक्या मोठ्या प्रमाणावर कामगारांना बोलवल्यावर त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं पाहिजे होतं, पण प्रशानसाच्या ढिसाळ नियोजन आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या अतिहस्तक्षेपामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

सुरक्षा साहित्य पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडे पुरेसे किट नसतानाही हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. बोलवलेल्या 7 हजार लोकांना द्यायला पुरेस किट नव्हते. सुमारे 2 हजार किट कमी पडत असल्याने एकच गोंधळ उडाला. एका दिवसाचा रोजगार बुडवून आलेल्या कामगारांना रात्री 11 पर्यंत किट साठी झगडावं लागलं, तर बाकीच्यांना आजही साहित्य मिळू शकलेलं नाही. या दरम्यान काही महिला बेशुद्ध पडल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

सरकारी योजना, कार्यक्रमांची भव्य आखणी करून गर्दी गोळा करायची आणि राजकीय फायदा उठवायचा असं भाजपाच्या नेत्यांचं नियोजन आहे. त्याचमुळे अशा पद्धतीने चेक आणि साहित्य वाटपाच्या कार्यक्रमांसाठी पुरेशी तजवीज नसतानाही गर्दी गोळा करण्याच्या प्रकारामुळे कामगारांमध्ये मात्र संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

Similar News