विहिरीत पडून महिला गंभीर जखमी, कधी थांबणार ‘तिची’ पायपीठ?...

Update: 2020-06-03 05:01 GMT

पालघर (Palghar) महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा. या जिल्ह्यातील आसे ग्रामपंचाययत मधील दापटी 2 येथील रखमी सखाराम फुफाने वय (45) ही महिला 30 फूट खोल विहीरीत पडून गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. नशीब बलवत्तर म्हणून ती वाचली. अन्यथा पाण्याच्या दोन घोटासाठी तिचा जीव गेला असता.

सध्या या महिलेवर मोखाड्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून सुरू असलेली टँकर अनियमितपणे येत असल्याने बुधवारी कशीबशी आलेल्या टँकरचे पाणी भरण्यासाठी विहिरीवर महिलांची एकच झुंबड उडाली. गर्दीमध्ये जखमी महिलेचा विहिरीत तोल जाऊन ही गंभीर घटना घडली आहे. विशेष म्हणजे राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. अशा स्थितीत लोकांची गर्दी होणं अत्यंत धोक्याचं आहे. मात्र, मधील काही दिवस टॅंकरच आला नाही तर लोकांची पाण्यासाठी गर्दी होणारच. असं या गावातील लोक सांगतात.

गेल्या काही दिवसांपासून ही महिला जखमी होऊन रुग्णालयात उपचार घेत आहे. तरीही अद्यापपर्यंत या महिलेची विचारपूस करायला प्रशासन लोकप्रतिनिधींना वेळ नाही.

एकीकडे देश कोरोनाशी लढत असताना येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतोय. परंतु याकडे प्रशासनेने गंभीरतेने लक्ष दिले नाही. तर येथे कोरोनाने नव्हे तर प्रथमत: पाणी टंचाईने बळी जातील. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मोखाड्यातील अनेक गावपाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या भीषण असून 319 कुटूंबाची वस्ती असलेल्या दापटी 2 गावात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावालगत 1 किमी अंतरावर असेलेले विहीर फेब्रुवारी महिना उजाडताच कोरडी पडत असल्याने येथील आदिवासींची घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू होते.

त्यामुळे टँकर शिवाय त्यांना पर्याय नसतो. परंतु टँकर नियमितपणे येत नाही. मागील तब्बल 21 दिवस आमच्या गावात टँकर आलीच नव्हती. यामुळे आम्हाला 3 किमी अंतरावर डोंगर पार करून लगतच्या गावातील विहिरीवरून रात्री आप रात्री हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

यानंतर पाणी पुरवठा विभागाचे सोनार व तहसीलदार यांना वारंवार विनवण्या करून तेव्हा कशी बशी आमच्या गावात टँकर आली असल्याचे देवराम वाजे या स्थानिक आदिवासी युवकाने मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितले. काय आहे तालुक्यातील पाणीटंचाईची परिस्थिती?

येथील परिस्थिती बघता दरवर्षीच फेब्रुवारी पासूनच पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढून एप्रिल- मे महिन्यात पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होतो. येथील टंचाईग्रस्त आदिवासींना हातातली कामे सोडुन घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. टंचाईग्रस्त गाव पाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीपासून टंचाईग्रस्त गाव पाडे २० - २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले असल्याने टँकर चालकांनाही चांगलीच कसरत करावी लागत आहे.

डोळ्यात तेल घालून चातकपक्षा प्रमाणे आदिवासींना टँकर ची दिवसभर वाट बघावी लागते. अतिदुर्गम डोंगराळ असलेल्या मोखाडा तालुक्यातील धामणी शास्त्रीनगर स्वामीनगर सातूर्ली अशी सात गावं व गोळ्याचापाडा, नावळ्याचापाडा, दापटी -1 दापटी – 2, तुंगारवाडी, कुडवा, वारघडपाडा, कुंडाचापाडा, हटीपाडा, पेंड्याचीवाडी ठाकुरपाडा, पोऱ्याचा पाडा, ठवळपाडा, डोंगरवाडी अशा 61 पाड्यांमध्ये व 24 गावांसह एकूण 75 गावपड्यांची तहान 26 टँकर द्वारे भागवली जात आहे.

यंदा पावसाने उशिरापर्यत जरी मुक्काम ठोकला असला तरी जसेजसे ऊन वाढत आहे. तस तशी टंचाई ग्रस्त गावपड्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. प्रशासन लोकप्रतिनिधीचे शून्य नियोजन व करोडोच्या अपयशी ठरलेल्या योजना मोखाडयाच्या पाणी टंचाईला कारणीभूत आहेत.

दरवर्षी या ठिकाणी प्रचंड पाऊस होऊन देखील शून्य नियोजनामुळे पाणी टंचाई उग्र होत असते. यामुळे फक्त टँकर लॉबीला जगवण्याचे काम केले जात असल्याचे दिसून येते. कोचाळे येथील मध्य वैतरणा प्रकल्पातून १२०कि मी अंतरावर मुबंईला शासनाने पाणी पोहचवले आहे. परंतु धरणा लगतच्या ४ते ५ किमी अंतरावरच्या गावांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

तसेच येथील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत, ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, नळपाणी पुरवठा आदी विभागांच्या माध्यमातून वर्ष भरात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत बंधारे, विहीरी मधील गाळ काढणे, शेततळे बांधणे, लघु पाटबंधारे, वन विभागाचे बंधारे, नळपाणी पुरवठा योजना, सिंचन विहीरी,आदी सह सेवाभावी संस्थानी बांधलेले बंधारे या कामावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला आहे.

त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाणी अडवण्यासाठी भूमिगत बंधारे तयार करण्यात आले. माञ, याचा फायदा नेमका किती झाला? याचे उत्तर आज ही प्रशासनाकडे नाही. कारण प्रातिनिधिक स्वरुपात बघितल्यास डोल्हारा तसेच धारेचापाडा येथील विहीरीच्या जवळ बंधारा बांधण्यात आला आहे. माञ, तरीही ही गाव पाणी टंचाई मध्ये प्रथम क्रंमाकावर असुन टँकर शिवाय पर्याय नाही.

त्याचबरोबर टॅकर अधीग्रहण करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास दिलेले असल्याने टॅकर सुरू होण्यास विलंब होत असल्याचा प्रत्यय टंचाईग्रस्त गाव पाड्यांना येतो आहे. तसेच पाणी टंचाईच्या नावाखाली गेल्या पाच वर्षात करोडो रुपये खर्च झाला आहे.

सन 2015- 16 मध्ये 89 लाख 71 हजार 640

2016 -17 मध्ये 1कोटी 21लाख 258

2017-18 1कोटी 61लाख 11 हजार 74

2018 -19 12 लाख 92 हजार 156

एवढा खर्च झाला असून गेल्या पाच वर्षात 3 कोटी 37 लाख 14 हजार 128 रुपये एवढा खर्च झाला असून आजतायत पाण्यासारखा पैसा खर्च होऊन ही महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट कमी झालेली नाही.

Full View

Similar News