“माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्याला फाशी द्या”

Update: 2020-01-03 06:30 GMT

पालघर - वीटभट्टी मालकानं एका मजुराला मारहाण करत त्याला गाडीखाली ढकलून त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केलाय. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या सापरोवीट गावात राहणाऱ्या राहुल पवार यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. पण वीटभट्टी मालकानंच राहुल यांना मारुन त्यांचा अपघाती मृत्यू दाखल्याचा आरोप त्यांच्या विधवा पत्नीनं केलाय. तसंच याची पोलीस चौकशी करण्याची मागणी एसपींकडे केली आहे.

मृत राहुल पवार हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातल्या अंजुरगाव इथं वीटभट्टीवर कामाला होते. तिथं वीटभट्टीमालकानं त्यांना जुन्या वीटा भरण्याचं काम सांगितलं. पण राहुलनं आपण फक्त वीट थापण्याचं आणि बनवण्याचं काम करणार असल्याचं सांगितल्यानंतर मालकानं त्याला शिवागाळ करत मारहाण केल्याचा आरोप राहुल यांच्या नातेवाईकांनी केलाय. त्यानंतर काही दिवसांनी राहुल पवार यांचा अपघात झाल्याचं त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. तसंच प्रकृती गंभीर असल्यानं राहुल यांना ठाण्याच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिथं उपचारा दरम्यान राहुल यांचा मृत्यू झाला. हा अपघात नसून वीटभट्टी मालकानंच त्याच्या गुंडांकरवी आपल्या नवऱ्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्याला गाडीखाली ढकलून दिल्याचा आरोप राहुलच्या पत्नीनं केलाय.

पोलिसात तक्रार केली तर तुमचाही जीव घेईन अशी धमकी वीटभट्टी मालकानं दिल्याचा आरोप मृत राहुल यांची बहिण गीता गुरूनाथ सावरा यांनी केलाय. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही म्हणून आता राहुल पवार यांच्या पत्नीनं थेट एसपींनाच पत्र लिहून चौकशीची मागणी केलीय.

राहुल पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांची पत्नी करतेय. एसपींना अर्ज दिलाय, पण अजून पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. मॅक्स महाराष्ट्रनं जेव्हा एसपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या चिमुरड्यांना घेऊन कसं जगायचं हा प्रश्न त्यांच्या पत्नीपुढे आहे, अशाही परिस्थितीत त्या आपल्याला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करतायत. त्यांच्या या संघर्षाची दखल आतातरी व्यवस्थेनं घेण्याची गरज आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/582475445924012/

 

Similar News