काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची मुलं भाजपमध्ये का जातात ?

Update: 2019-03-20 09:10 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज (दि. २० मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील प्रस्थापित नेत्यांच्या महत्त्वाकांक्षी मुलांनी आता थेट भाजपमध्येच प्रवेश करून राजकीय करिअर करण्याचं ठरवलंय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय याच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनीही समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, यावेळी विजयसिंह यांनी प्रवेश केलेला नाही. त्यामुळं त्यांच्या भूमिकेकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची विद्यमान खासदार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची मागणी होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळं मंगळवारी मोहिते यांनी दुपारी अकलूजमध्ये समर्थकांचा मेळावा घेतला. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. गरवारे क्लबमध्ये पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडला. यावेळी मोहिते-पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख ही भाजपाची बडी नेतेमंडळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळी उपस्थित होती. रणजितसिंह मोहिते-पाटील हे सध्या भाजपमध्ये आले आहेत. तर त्यांचे वडिल विजयसिंह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळं विजयसिंह हे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे ही भाजपमध्ये जातील, असा कयास लावला जात होता. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यापर्यंतच्या बातम्य सोशल मीडियामध्ये झळकल्या. त्यामुळं काँग्रेस आघाडीमधील बड्या नेत्यांची मुलं भाजपमध्ये आणि वडील आघाडीसोबत असं विचित्र चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय. काँग्रेस आघाडीतल्या बड्या नेत्यांची मुलं ऐन निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये का जात आहेत, हा मोठा प्रश्न आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींसमोर उभा राहिला आहे.

Similar News