सोशल मिडीयामुळे होतायत का तरुणांच्या आत्महत्या?

Update: 2019-07-20 12:16 GMT

सोशल मीडियाची क्रेज सध्या सर्वत्रच पसरली आहे. तरूणांचा तर सोशल मिडीया एक महत्त्वाचा साथी झाला आहे. पण गेल्या काही दिवसात समोर आलेल्या काही घटनांमुळे सोशल मिडीया हा चागंला की वाईट? असा प्रश्न सातत्याने निर्माण होतोय.

मोबाईल न दिल्यामुळे आत्महत्या, टिक-टॉक बनवू दिल्यानं आत्महत्या, या आणि अशा अनेक घटना कानावर पडल्या की आपल्या देशातील तरुण कोणत्या मार्गाने चाललाय असा विचार सहज मनात येऊन जातो.

तरुणांचा सोशल मिडीयाकडे वाढलेला कल हा भविष्यात चुकीचा ठरेल असं काहीसं चित्र निर्माण झालंय. पण या सर्व घटनांना सोशल मीडियाच कारणीभूत आहे, असे ठरवणे कितपत योग्य ठरेल? या विषयावर आम्ही डॉ. अदिती आचार्य यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मते, 'ज्याप्रकारे दारु, ड्रग्स हे व्यसन आहे तसंच सोशल मीडियाही एक प्रकारच व्यसनच आहे. या गोष्टी जशा मानवी शरीरावर परिणाम करतात त्याच प्रमाणे सोशल मीडिया हा ही तितकाच परिणाम करतो. यामुळे तरुण मुलं-मुली आभासी जगात जगायला लागलीयत. ते अनेक व्हर्च्युअल गोष्टींमध्ये गुंतत जात आहेत. त्यामुळे काही काळानंतर त्यांना येणारा एकटेपणा, मानसिक ताण या सर्व गोष्टी कुठेतरी त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात.'

पण आत्महत्येच्या या सर्व घटनांना आजची तरुणाई जितकी कारणीभूत आहे तितकेच त्यांनचे पालकही कारणीभूत आहेत. कारण आजकालचे बहुतांश पालक हे लहानपणापासूनच आपल्या मुलांना मोबाईल हाताळण्यासाठी देतात. त्यामागे त्यांचा हेतू वाईट नसतो. पण नकळत का होईना ही त्यांची सुरवात होते. म्हणून पालकांनीही या विषयात जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

थोडक्यात काय, तर सोशल मीडियाचा वापर हा फक्त कामापुरताच करावा. तर आणि तरच सोशल मिडीया हा आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच सोशल मिडीयाचा वापर करताना आपण त्याच्या आहारी तर जात नाही ना? या गोष्टीचा ही विचार केला पाहिजे.

Similar News