एकनाथ खडसे परिवारातील उमेदवारीला शिवसेनेचा विरोध

Update: 2019-03-22 10:19 GMT

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय हाडवैर संपता संपत नाहीये. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपात युती झाली असली तरी तिकडं जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील शिवसैनिकांनी मात्र वेगळा पवित्रा घेतलाय.

रावेर लोकसभेच्या जागेवर खडसे कुटुंबातील कुणीही उमेदवार असला तरी शिवसेना त्यांना मदत करणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला होता. यावेळी शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मुक्ताईनगर मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर एकनाथ खडसे यांनी खोटे गुन्हे दाखल केले असून खडसे यांनी नेहमीच शिवसेना संपविण्याची भाषा केली असल्याचा आरोप करत शिवसेना कार्यकर्ते नाराज असल्याचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी खडसे परिवारातील उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

गेल्या तीस वर्षांपासून रावेर लोकसभेची जागा भाजपासाठी सोडण्यात आलीय. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची ऐनवेळी उमेदवारी रद्द करून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. जिल्हा दुध फेडरेशनचं अध्यक्षपद, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, आमदार, खासदार आदी महत्त्वाचे पद खडसे यांनी परीवारालाच दिलीय. भाजपा आणि शिवसेनेची जरी युती असली तरी रावेर लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवाराचा प्रचार केला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतलाय.

रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली असतानाही स्थानिक शिवसेनेचा विरोध कायम आहे.

दरम्यान उमेदवार कोणताही असला तरी युती धर्म पाळा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र, चित्र वेगळे आहे.

Full View

Similar News