सनातनला मिरच्या का झोंबतात...

Update: 2018-08-27 14:49 GMT

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि बाकी इतर विचारवंतांच्या हत्यांच्या मागे अंधहिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हात असल्याचं तपास यंत्रणांच्या तपासात पुढे आल्यानंतर आता सीबीआय आणि एटीएसने अटक आणि धाडसत्र सुरू केले आहेत. अटक करण्यात आलेले तसंच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या अंधहिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या बचावासाठी सतत आपला वकिल नेमणाऱ्या सनातन ने आता आमच्यावर बंदीची मागणी का असा प्रतिप्रश्न विचारायला सुरूवात केली आहे.

सनातन आणि हिंदू जनजागृती समिती च्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पकडण्यात आलेल्या अतिरेक्याशी आपला संबंध नसल्याचं म्हटलंय. काही पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे जाणून-बुजून सनातनचं नाव घातपाती कारवायांशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सनातन आणि हिंदू जनजागृती समितीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.

सनातन ला भाजपची चिंता.आपली भूमिका मांडत असताना सनातन ने आरोप लावलाय की हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या संपूर्ण पत्रकार परिषदेत सनातन झालेल्या हत्यांबद्दल खेद व्यक्त करताना दिसत नाही, या उलट सनातन, हिंदू जनजागृती समिती तसंच इतर संस्था विविध व्यासपिठांवर झालेल्या हत्यांचं समर्थनच करताना दिसतात.

सनातनचा फुसका बार

सनातन वर बंदीची मागणी याआधीच्या सरकारने केंद्र सरकार कडे केलीय. ज्या भाजपच्या प्रतिमेची सनातन ला चिंता आहे, त्या भाजपने ही बंदीबाबत यंदा केंद्राकडे सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे काही पुरोगामी ही मागणी सरकार ला बदनाम करण्यासाठी करत आहेत हा सनातनचा आरोप फुसका बार ठरला आहे.

Similar News