Ground Report : गेला रस्ता कुणीकडे?

Update: 2020-07-30 15:28 GMT

दरवर्षी पावसाळा आला की रस्त्यांमधले खड्डे हा विषय चर्चेत येतो. यंदा कोरानामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय मागे पडलाय. पण सांगली जिल्ह्यातील विजापूर- गुहागर महामार्गच गायब झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. पूर्वी राज्य मार्ग क्रमांक ७८ अंतर्गत येणाऱ्या या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग १६६ ई मध्ये रुपांतर झाले.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्याच्या पूर्वीच सांगली जिल्ह्यात या मार्गाचे काम सुरू झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी आंदोलनेही केली. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हा रस्ता खोदण्यात आला. पण आपल्या जमिनींचे कायदेशीर भूसंपादन केलेले नाही, मोबदला दिलेला नाही असा आरोप करत शेतकऱ्यांनी यावर हरकती घेतल्या.यानंतर घाटनांद्रे इथे कंपनीने खोदून ठेवलेला रस्ता तसाच सोडून दिला आहे.

या रस्त्यावरून जाताना हा रस्ता आहे की नांगरलेले शेत आहे असा प्रश्न पडतो. इथले नागरीक सोपान शिंदे सांगतात की, “या रस्त्यामुळे आमचा वनवास सुरू आहे. गाड्यांचे नुकसान होते, कोणी आजारी असेल तर त्याला रुग्णालयात पोहचवण्यासाठी दूरच्या मार्गाने जावे लागते.या संदर्भात येथील माजी सरपंच अमर शिंदे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना " सदर कंपनीने केवळ येथील शेतकऱ्यांना वेठीस धरण्साठी हा खोदलेला रस्ता आहे” असा आरोप केला आहे.

हा अतिशय वर्दळीचा रस्ता असून येथे दररोज अपघात होतात. अनेक मोठे कंटेनर, इतर वाहने इथं चिखलात फसतात. याबाबत आमच्या प्रतिनिधीने कंपनीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगावकर यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सदर रस्त्यावर आम्ही चिखल काढून मुरूम टाकलेला आहे असा दावा केला. पण यानंतर त्यांना सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर चिखल काढून मुरूम टाकून घेण्याचा आदेश देतो, असे सांगितले. तर राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे जनरल मॅनेजर पिसाळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिवसभर फोन उचलला नाही. या रस्त्याचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना कंपनीने खोदलेला रस्ता देखभाल दुरुस्ती अंतर्गत तात्पुरता तरी दुरूस्त करावा अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे.

Similar News