Pulwama : सैनिकांच्या विमान प्रवासाला मंजुरी, उशीरा सुचलेलं शहाणपण

Update: 2019-02-21 10:51 GMT

14 फेब्रुवारीला काश्मीरमधल्या पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनातून जाणाऱ्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्याचवेळी पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती यांनी परिस्थिती माहिती असूनही जवानांना वाहनानं आणल्याप्रकरणी सरकारवर टीका केली होती. विमानं काय फक्त नेत्यांसाठीच आहेत काय, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्रालयानं केंद्रीय सशस्त्र अर्धसैनिक दलांच्या सर्व कर्मचाऱ्यांना विमान प्रवास करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहमंत्रालयाच्या या निर्णयानंतर दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू या मार्गावर ड्युटीवर हजर राहताना किंवा सुटीवर जाताना केंद्रीय सशस्त्र अर्धसैनिक दलांचे म्हणजे बीएसएफ, एसएसबी, सीआरपीएफमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना विमानानं प्रवास करता येणार आहे. गृहमंत्रालायाच्या या निर्णयाचा फायदा 7 लाख 80 हजार जवानांना होणार आहे. मात्र, हाच निर्णय जर थोडा आधी घेतला असता तर 40 जवानांचा जीव वाचला असता, अशी चर्चा सोशल मीडियात उमटायला लागल्या आहेत.

Similar News