राणे आणि पवारांच्या भेटीत दडलंय काय? 

Update: 2018-12-03 12:04 GMT

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच तयारीला लागले आहेत. कधी सकाळी आठ वाजता ते नागपुर विमानतळावर असतात तर कधी साताऱ्याच्या गेस्ट हाऊसला. एखाद्या तरुण पुढाऱ्यालाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांचे राज्यात राजकीय दौरे सुरु आहेत.

त्यातच आज त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची कणकवली येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत असलं तरी शरद पवार सहजा सहजी कोणाची भेट घेत नसतात. हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे पवारांची आणि राणेंची ही भेट राजकीय होती हे कोणीही सांगेल. मात्र, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

भाजप आणि शिवसेनेवर दबाव?

या भेटीनंतर शिवसेना आणि भाजपवर दबाव टाकण्याचा पवार आणि राणेंचा डाव असल्याचं बोललं जात आहे. राणेंनी कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर भाजपने राणेंना मंत्रीमंडळाचं गाजर दाखवलं. मात्र, पक्ष सोडल्यानंतर सेनेच्या दबावामुळे राणेंना मंत्रीमंडळात स्थान देता आलं नाही. नव्यानं स्वाभिमानी झालेल्या राणेंना नवीन पक्ष काढून राज्यसभेवर धाडण्यात आलं. मात्र, राणेंना ना केंद्रात स्थान मिळाले ना राज्यात. राणेंचे आणि सेनेचे नाते हे विळ्या भोपळ्याचे नाते असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. आगामी निवडणुकीत जर भाजप सेना युती झाली नाही, तर कोकणात भक्कम असलेल्या सेनेला धक्का देण्यासाठी राणेंचा वापर करण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र, मराठा आरक्षणानंतर सेना आणि भाजप जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळे राणेंची कोंडी होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन पवारांनी राणेंची भेट घेत दोन दगडावर हात ठेवणाऱ्या भाजपला धक्का दिला आहे. त्याचबरोबर कोकणात मजबूत असणाऱ्या शिवसेनेला शह देण्यासाठी राणे उपयुक्त असल्यानं राणेंची भेट घेऊन संभ्रम निर्माण केला आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत राणे शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप सोबत जातात की राष्ट्रवादी सोबत हा येणारा काळच ठरवेल मात्र, पवारांनी आपल्या भेटीतून राजकीय संभ्रम निर्माण केला हे मात्र, खरं...

Similar News