पुत्रप्रेमासाठी विखेंची तर पक्षासाठी पवारांची प्रतिष्ठा पणाला…      

Update: 2019-03-11 16:19 GMT

गेल्या दोन ते तीन वर्षापासून अहमदनगर दक्षिणमधून निवडणुकीची तयारी करणाऱ्या सुजय विखे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस जागा सोडायला तयार नसल्यानं भाजपमध्ये प्रवेश करावा लागण्याची चिन्हं आहेत. शरद पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत अहमदनगरची जागा राष्ट्रवादीची असल्याचं सांगत ही जागा कॉंग्रेसला सोडणार नसल्याचं सांगितलं.

त्यानंतर आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत या जागेसंदर्भात चर्चा केली. मात्र, राहुल गांधी यांनी सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत लाल कंदील दाखवल्याचे समजते. तसंच राहुल यांनी सुजय यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे.

मात्र, या संदर्भात पवारांनी पुण्याच्या पत्रकार परिषदेत सुजय विखे यांचे आघाडीसाठी योगदान काय? असा सवाल करत सुजय यांच्या राष्ट्रवादी प्रवेशा संदर्भात नकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे सुजय विखे यांना आता भाजपच्या चिन्हावर लढावं लागण्याची शक्यता आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील नगर दक्षिणची जागा मिळवण्यासाठी आग्रही आहे. यासाठी त्यांनी विरोधी पक्षाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

Similar News