चारा घोटाळा: तिसऱ्या प्रकरणातही लालूप्रसाद यादव दोषी

Update: 2018-01-24 07:14 GMT

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्याशी निगडीत तिसऱ्या प्रकरणातही दोषी आढळले आहेत. चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना आज दोषी ठरवले. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही कोर्टाने दोषी ठरवले आहे. चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवण्यात आले.

लालू करणार उच्च न्यायालयात अपील

लालूप्रसाद यादव यांना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तिसऱ्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर आरजेडीचे ज्येष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी चारा घोटाळ्यातील सर्व निर्णयांविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले आहे. माजी उपमुख्यमंत्री व लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी देखाल हा भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कट असल्याचा आरोप करत याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

लालू कैदेत…

लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्यातील देवघर कोषागारशी निगडीत एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरूंगात कैदेत आहेत. या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीला पूर्ण झाली होती.

 

 

Similar News