धनंजय मुंडेंना दणका, 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल...

Update: 2019-06-14 08:47 GMT

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून , आजच या प्रकरणाची सुनावणी होत आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय सुनावणी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

काय आहे संपुर्ण प्रकरण?

राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीनुसार २०११ मध्ये जगमित्र शुगर मिल्स प्रा. लि.साठी, अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जमीन धनंजय मुंडे यांनी खरेदी केली होती. ही जमीन बेलकुंडी मठाला इनाम दिलेली होती. मठाचे पूर्वीचे महंत रणजित व्यंकागिरी हे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांनी जमिनीवर स्वत:च्या मालकीची परस्पर नोंद करून घेऊन त्या जमिनी विकल्या. शासनाची आणि न्यायालयाची दिशाभूल करत वेगवेगळे दावे दाखल करून ती जमीन स्वत:ची असल्याबाबत हुकूमनामे देखील करून घेतले. या जमिनी इनामी असून त्यांची विक्री करता येणार नाही, असे असतानाही वारसांनी खोट्या खरेदी खता आधारे जमिनीची विक्री केली. धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्याआधारे सदर जमिनी खरेदी केल्या व राजकीय वजन वापरत अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून सदर जमिनीचे खरेदीखत, फेरफार आणि एनए करून घेतला. खरेदीखत करताना कायदेशीर बाबींच्या पूर्तता करण्यात आल्या नाहीत. तसेच, पूस येथील ज्ञानोबा सीताराम कोळी यांचा मृत्यू झालेला असतानाही ते जिवंत आहेत असे दाखवून जमीन खरेदीसाठी त्यांच्या अंगठ्याचा ठसा संमतीपत्रावर लावलेला आहे. इनामी जमिनीच्या या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून, शासनाची फसवणूक करून करोडो रुपयांचा अपहार झाला असून ,सध्या ही सर्व जमीन जगमित्र शुगर मिल्सचे चेअरमन धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे, असे राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीत नमूद आहे.

कोणावर झाला गुन्हा दाखल?

राजाभाऊ फड यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यासह चंद्रकांत रणजीत गिरी, ज्ञानोबा सीताराम कोळी, गोविंद सीताराम कोळी, बाबू सीताराम कोळी, उद्धव कचरू सावंत, माणिक तुकाराम भालेराव, विठ्ठल गणपतराव देशमुख, धोंडीराम अण्णा चव्हाण, दिगंबर वसंत पवार, राजश्री धनंजय मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे, वाल्मिक बाबुराव कराड आणि सूर्यभान हनुमंतराव मुंडे या १४ जणांवर बर्दापूर पोलिस स्थानकात कलम ४२०, ४६८, ४६५, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.

Similar News