ठाकरे सरकारने मृत्यूचा आकडा लपवला! देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानंतर 1328 कोरोना मृत्यूची नोंद!

Update: 2020-06-16 18:43 GMT

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू दडविण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यात तथ्य आढळले आहे.

या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब असल्याचं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं होतं.

त्यानंतर आज मुंबईत 862 आणि अन्य जिल्ह्यांतील 466 कोरोना मृत्यू जाहीर करण्यात आले आहेत.

असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोनाचे मृत्यू म्हणून आता नोंदले जातील.

यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी ‘माझी राज्य सरकारला विनंती आहे की, या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचे गोंडस नाव न देता, गेल्या 3 महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितले गेले पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. अशी मागणी केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. मात्र, ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली.

आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे.

इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

काय म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी?

दरम्यान ही बाब उघडकीस आल्या नंतर हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठविले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे त्यात म्हटले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी हा झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न आहे. असं म्हणत याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Similar News