ग्राऊंड रिपोर्ट : वाराणसीतील बजरडीहा, जिथे अजूनही घोर शांतता किंचाळत आहे

Update: 2019-12-29 08:47 GMT

CAA आणि NRC च्या विरोधात देशाच्या विविध भागांमध्ये रोज निदर्शनं सुरू आहेत. अनेक ठिकाणी होणाऱ्या निदर्शनांना हिंसाचाराचे स्वरुप येत आहे. उत्तर प्रदेशातही मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि निदर्शने करण्यात येत आहेत. या आंदोलनांदरम्यान झालेल्या कारवाईत अनेकांचे बळीही गेले आहेत.

वाराणसीमधील बजरडीहामध्ये मागच्या शुक्रवारी काही लोकांनी शांतीपूर्ण मार्गाने CAA आणि NRC च्या विरोधात निषेध मोर्चा काढला. मात्र, तरीही त्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ वर्षीय सगीर अहमद या मुलाचा मृत्यू झाला तर एक डझनाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाराणसीतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यातील दोन लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.

hindi.newsclick.in

या घटनेनंतर बजरडीहा आणि परिसरातील परिस्थिती काय आहे यावरचा एक विशेष वृत्तांत...

वाराणसी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण-पश्चिम दिशेला ११ किमी अंतरावर असलेल्या बजरडीहा परिसरातील रहिवासी नुरुद्दीन (नाव बदलेले) यांनी नाव न सांगण्याच्या विनंतीनंतर सांगितलं की, ‘ मी ५६ वर्षांचा आहे. मी माझ्या आयुष्यात एवढे पोलिस यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. आम्ही येथे घाबरुन राहत आहोत. कोणीतरी आम्हाला मारेल अशी भिती वाटत आहे. आम्हाला वाचविण्यासाठी कोणीही येणार नाही. हा दिवस पाहायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण हे सरकार असे दिवस दाखवत आहे.’

मृतक सगीर अहमदची आजीने अश्रू पूसत सांगितलं की, ‘नमाजसाठी गेलेला माझा नातू परत आलाच नाही. सगीरला आई नाहीय. त्याचे पालनपोषण आम्ही करत होतो. सगीर म्हणायचा की, आजी मी मोठा झाल्यावर तूझ्यासाठी कपडे आणेल. सगीर तिकडे का गेला माहीत नाही. गेला नसता तर तो आज माझ्या नजरेसमोर असता.’

hindi.newsclick.in

एका आठवड्यानंतरही रस्त्यांवर निरव शांतता

वाराणसीतील डिझेल रेल्वे इंजिन फॅक्टरी जवळील बजरडीहा हे वर्दळीचे ठिकाण आहे. इथे कायम वर्दळ असते. मात्र, पोलिसांच्या लाठीचार्जनंतर इथं शांतता आहे. या घटनेला एक आठवडा होऊन गेला असला तरी पोलिस बंदोबस्त अजूनही कायम आहे. काही ठिकाणी दुकाने उघडली असली तरी तेथे मोजकीच लोक आहेत.

‘मुस्लिम आहोत म्हणून हे असे घडले’

एका चहाच्या दुकानात असलेले ४५ वर्षीय शम्सू नावाच्या व्यक्तीनं सांगितलं की, “येथे विणकाम करणारे कामगार आणि मुस्लिम समाज जास्त आहे. सर्वांना माहीत आहे की, शुक्रवारी नमाजासाठी सर्व समाज एकत्र येतो. त्यामुळे नामाजानंतर लोकं मशिदीतून बाहेर पडल्यानंतर मुद्दाम लाठीचार्ज करण्यात आला. जेणेकरुन जास्तीत जास्त मुस्लिमांना मारता येईल. आम्ही मुस्लिम आहोत आणि या देशाच्या सरकारला मुस्लिम लोकं नकोत. आम्ही या देशातून पळून जावे म्हणून असं केलं जात आहे”.

अजूनही पोलिसांचा पहारा

ही घटना घडून आठवडा पूर्ण झाला तरीही परिसरात पोलिस बंदोबस्त कायम आहे. या परिसरातील मशिदींबाहेर आणि लाठीचार्ज झालेल्या ठिकाणी सर्वात जास्त पोलिस तैनात आहेत. बजरडीहा भागातील लमही, अहमद नगर, महफूज नगर, मकदूम नगर, गल्ला, आझाद नगर, अंबा, धरहरा, मुर्गिहा टोला, फारुखी नगर, जक्खा, कोल्हुआ या सहीत अनेक ठिकाणी शुक्रवारपासून शांतता पसरली आहे.

दगडफेक, चेंगराचेंगरी आणि लाठाचार्जनंतर पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान दंगल नियंत्रण उपकरणांसह तैनात आहे. १५ आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक घरांवर छापे टाकले. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी घरातून पळून गेले होते.

hindi.newsclick.in

आता लोक घरी परतत आहेत

लाठीचार्ज झाल्यानंतर परिसरातील लोकं आपलं घर सोडून नातेवाईकांकडे निघून गेले होते. ते लोकं आता आपल्या घरी परत येत आहेत. कामरून निशा सांगतात की, “माझ्या घरात कोणी कर्ता पुरुष नाही. माझ्यासोबत फक्त माझा मुलगा राहतो. ज्यादिवशी लाठीचार्ज झाला. तेव्हा रात्री पोलीस आमच्या घरी आले होते. म्हणून आम्ही सकाळी माझ्या बहिणीकडे निघून गेलो.”

साबीर सांगतात की, “लाठीचार्ज झाल्यानंतर पोलिसांनी १५ ते ३५ वर्षांच्या लोकांना शोधून पकडून नेत होते म्हणून मी माझ्या आजीकडे निघून गेलो होतो. जेव्हा सर्व शांत झाले तेव्हा मी इकडे परत आलो.”

१७ वर्षीय आमीरने घाबरून सांगितलं की, “परिसरात पोलीस ओरडून सांगत होते, २५० लोकांना पकडण्याचा आदेश आहे. ज्या लोकांना अटक होईल त्यातल्या २० लोकांना जामीन मिळणार नाही.”

लोकं घरात कैद्यासारखे राहत आहेत

मुरादाबादचे लाल मोहम्मद हे पत्नी रुखसाना आणि मुलगा रासिन यांच्यासोबत बजरडीहामध्ये राहतात. लाल मोहम्मद यांनी नेहमीप्रमाणे गेल्या शुक्रवारी देखील आपले दुकान उघडले होते.

येथील अन्य रहिवासी रेयाज म्हणतात की, “मी माझ्या आई वडीलांकडून पोलिसांविषयी खूप काही ऐकलं होतं. मात्र आता ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आता मला समजलं की, लोकं पोलिसांना इतकं का घाबरतात. आम्ही हे कधीच विसरू शकणार नाही.” लाठीचार्जमध्ये रेयाजला पोलिसांचा मार देखील लागला आहे.

पोस्टर छापून पोलीस घेत आहेत लोकांचा शोध

गेल्या शुक्रवारी झालेल्या लाठीचार्जमध्ये पोलिसांनी एक पोस्टर छापले. त्यात काही लोकांचे फोटो होते. हे पोस्टर परिसरातील पोलीस चौकी आणि मशिदीच्या बाहेर लावण्यात आले आहेत. संबंधित लोक लवकर सापडण्यासाठी बक्षीसही घोषित केले आहे. तसेच एक व्हाट्सएप नंबरदेखील दिला आहे. यामुळे या भागात अजून तणाव निर्माण झाला आहे.

पोस्टरमधील लोक निर्दोष आहेत

पोस्टरमधील लोकांबद्दल विचारले असता, तेथील रहिवासी सलमान अन्सारी म्हणतात की, “मला या पोस्टरमधील पुष्कळ लोकांची माहिती आहे. ज्यांचे फोटो पोलिसांनी दिले आहेत ते सर्व चांगले लोक आहेत. पोलिस या लोकांना का शोधत आहेत हे कळत नाही. हे सर्व निरपराध आहेत. ते लोक गरीब आणि नामाजी आहेत. जेव्हापासून त्यालोकांनी आपले फोटो पोस्टरमध्ये पाहिले आहेत तेव्हापासून त्यांनी शहर सोडलं आहे.”

आम्हाला शांती हवी आहे

‘त्या’ दिवसाच्या घटनेबद्दल विचारले असता, ऐनुलहक म्हणतात की, “आम्ही सरकारला विनंती करतो की आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. आम्हाला फक्त दोन वेळची भाकर पाहिजे बाकी काहीही नाही. आपल्या लोकांचे अश्रू आणि रक्तपात आम्ही पाहू शकत नाही.”

५० वर्षीय जमील आलम म्हणतात की, “एखाद्याला आमची अडचण असेल तर आम्हाला मारून टाका, पण अशा घटना घडवून आणू नका. विनाकारण आमची बदनामी करू नका. आम्ही येथे जन्म घेतला आहे आणि येथेच दफन होऊ. हा आमचा देश आहे आणि आम्ही काहीही कसं ऐकायचं?”

या विरोध प्रदर्शनामुळे अनेक निरपराध लोकांना शिक्षा मिळत आहे. अशी दयनीय स्थिती बजरडीहा मध्ये निर्माण झाली आहे.

सौजन्य - न्यूजक्लिक हिंदी

सदर वृत्तांत hindi.newsclick.in या वेबसाईटवर प्रकाशित झालेला आहे.

Similar News