tik tok सारखे App बंद करुन चीनच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पाडणार का?

Update: 2020-07-01 12:24 GMT

सध्याच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर 'बायकॉट चायना' हा नारा जोर धरू लागला आहे. कारण आहे. देशाच्या सीमेवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती. यालाच जोड म्हणून की काय काल सरकारने देशामध्ये 59 चायनीज ऍप्स बॅन करण्याचा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाचे स्वागतही आहे. पण ह्या ऍप्सवर बंदी आणली म्हणजे आपण चायनाच्या इकॉनॉमीला भगदाड पाडलं असा गोड गैरसमज आज सर्वसामान्यांमध्ये निर्माण होतोय. जे की 'मुंगेरीलाल के हसीन सपने' बघण्याचाच प्रकार झालाय.

भारत आणि चीन हा सीमावाद मागील 40 वर्षांपासून सुरु आहे. परंतु काही दिवसांपूर्वी चीनने देशाच्या सीमेवर आपल्या हालचाली वाढवल्या. ज्यामुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला. या तणावजन्य परिस्थितीमध्ये जवळपास 20 भारतीय सैनिक हुतात्मे झाले. आणि त्यानंतर देशभरात 'बायकॉट चायना' ह्या नाऱ्याखाली चिनी वस्तूंवर बहिष्कार घालत चायनीज वस्तूंना नकार दिला गेला.

ज्याचा परिणाम आज खेड्यांपर्यंत येऊन पोहोचलाय. परंतु चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे हे दिसत तेवढं सोपं नाही. कारण दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही फक्त एकमेकांना जोडली गेलेली नाही. तर एकमेकांवर अवलंबून देखील आहे.

एक मुजोर राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या चीनची आशियाखंडातील पहिल्या क्रमांकाची तर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त जीडीपी असणारी अर्थव्यवस्था असल्याची ओळखही आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेची भारताबरोबर तुलना म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

भारत आणि चीनची आयात निर्यात

भारतामध्ये गुंतवणूक करून आपले स्थापत्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांना लागणारे सर्व प्रकारचे औद्योगिक साहित्य आणि कच्चा माल पुरवणारा चीन हा अमेरिकेनंतर दुसरा सर्वात मोठा भागीदार आहे.

भारत आणि चीन मध्ये होणाऱ्या आयात-निर्यातीचा विचार केल्यास वर्ष 2019-2020 मध्ये भारताने एकूण निर्यातीच्या 5% निर्यात चीनला केली जी की, तिसऱ्या क्रमांकाची मोठी निर्यात आहे. तर एकूण आयातीच्या बाबतीत 14% आयात ही चीनकडून करण्यात आली आहे. जी की एकूण आयातीच्या बाबतीत सर्वात मोठी आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ह्या 14% मध्ये भारत चीनकडून औषधी सामग्री, स्मार्टफोन, विजेची उपकरणे, लोह, मेट्रो रेल कोच, केमिकल्स, इंजिनिअरिंग सामग्री आणि प्लास्टिक अशा अनेक गोष्टी आयात करतो. एवढंच काय तर वर्ष 2000 पडून वर्ष 2018-19 पर्यंत ही आयात 45 पटीने वाढली आहे.

भारत आणि चीनची अंतर्देशीय गुंतवणूक...

भारतातील गुंतवणुकीचा विचार केल्यास जवळपास 800 पेक्षा जास्त चिनी कंपन्या भारतात गुंतवणूक करतात. ज्यामध्ये स्मार्टफोन, पॉवर गेअर, ऑटोमोबाइल्स, इलेकट्रोनिक साहित्य, ऑप्टिकल फायबर तसेच रसायन इत्यादी प्रॉडक्टस येतात. तर ओप्पो, व्हिओ, हेअर, साइक आणि मिडेआ सारख्या नामांकित चायनीज कंपन्या यामध्येच मोडतात.

ज्या प्रकारे चायनीज कंपन्या भारतात गुंतवणूक करतात. त्याच प्रकारे भारतातील नामांकित कंपन्याही चीनमध्ये गुंतवणूक करतात. ज्यात अडाणी ग्लोबल लिमिटेड, जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, डॉ. रेड्डीस लॅबोरेटरीस लिमिटेड, B.E.M.L. लिमिटेड, गोदरेज, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि औरोबिंदा फार्मा सारख्या नामांकित कंपन्या जोडल्या गेलेल्या आहेत.

ही झाली चीन आणि भारतीय कंपन्यांची सरळमार्गे केलेली गुंतवणूक. ही गुंतवणूक इथेच थांबत नाही. तर यात आडमार्गे केलेली गुंतवणूकही सामील आहे. अनेक चायनीज कंपन्या आपल्यावर चायनीज असा शिक्का मोर्तब होऊ नये. यासाठी आडमार्गे गुंतवणूक करतात.

जी गुंतवणूक सिंगापूर, मॉरिशस आणि हॉंगकॉंग या देशांमार्फत केली जाते. उदाहरण द्यायचं झाल्यास चीनच्या अलीबाबा ग्रुपची पेटीएम मध्ये असणारी गुंतवणूक. पेटीएम भारतात सिंगापूर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत गुंतवणूक करतो. ज्यामुळे या आणि अशा अनेक चायनीज कंपन्या भारताच्या चिनी गुंतवणुकीच्या यादीतून सुटतात आणि त्यांचा पत्ता लावणेही फार कठीण आहे.

उदा. यामध्ये बिगबास्केट,फ्लिपकार्ड,स्नॅपडील,झोमॅटो,स्विगी,पॉलिसी बाजार ,ओयो आणि ओला अशा अनेक चिनी कंपन्या सामील आहेत.

भारत आणि चीन पर्यंटन

पर्यटन मंत्रालयाच्या माहिती नुसार फक्त आयात निर्यात आणि गुंतवणुकीय दृष्ट्याच नाही तर पर्यटकीय दृष्ट्यासुद्धा चीन भारतासाठी महत्वाचा आहे. चीन हा भारताचा आठव्या क्रमांकाचा सर्वात मोठा पर्यटक देश आहे. आणि या पर्यटकांमधील 48% पर्यटक हे व्व्यावहारिक दृष्ट्या भारतात येत असतात. वर दिल्या माहितीवरून तरी चायनिज ऍप बॅन करून आपण चीनच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पाडणार असल्याची स्वप्न बघणार्यांचे डोळे उघडतील ही अपेक्षा.

शुभम शिंदे...

Similar News