झुंज अपयशी ! ऑस्ट्रेलियाकडून बांग्लादेशचा पराभव

Update: 2019-06-21 07:56 GMT

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने 48 धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 382 धावांचे आव्हान बांग्लादेशला गाठता आले नाही. मात्र बांग्लादेशने तीव्र संघर्ष केला. बांग्लादेशने सामना जिंकला नसला तरी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या सामन्यात धावांचा पाऊस पडला. 100 षटकांत एकूण 714 धावा काढण्यात आल्या.

नॉटिंग्घममध्ये खेळला गेलेला विश्वचषकातील 26वा सामना षटकार अन् चौकारांची आतषबाजी करणारा ठरला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. मैदानावर उतरलेली कांगारूंची सलामीची जोडी बांग्लादेशच्या गोलंदाजांवर तुटून पडली. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिन्च यांच्यात 121 धावांची भागिदारी झाली. मात्र 53 धावांवर असतांना फिन्च बाद झाला. तरीदेखील ऑस्ट्रेलियाची धावसंख्या मंदावली नाही. डेव्हिड वॉर्नरने तडाखेबंद फलंदाजी केली. त्याला उस्मान ख्वाजाने साथ दिली. दोघांनीही ऑस्ट्रेलियाला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. वॉर्नरने नुसतेच शतक नाही तर दीडशतक ठोकले. 166 धावांवर वॉर्नर बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेला ग्लेन मॅक्सवेल तळपला. त्याने 10 चेंडूत 32 धावा केल्या. तो धावबाद झाला. तर उस्मान ख्वाजाही 89 धावांवर बाद झाला. शेवटी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 381 धावांपर्यंत मजल मारली.

बड्या बड्यांना धक्का देणारा बांग्लादेश डोंगराएवढे आव्हान पाहून दबावात येईल, असे वाटले होते. सुरुवातीला सोम्य सरकार धावबाद झाल्याने तशी झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर तमिम इकबाल आणि शाकिब-अल-हसन यांनी किल्ला लढवला. दोघांनीही बांग्लादेशला शंभरी ओलांडून दिली. शाकिब-अल-हसनने आपल्या दमदार फलंदाजीने विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात तो मोठी खेळी करेल, असे वाटले. मात्र 41 धावांवर तो बाद झाला. पण यानंतरही बांग्लादेशने तीव्र संघर्ष केला. तमिम इकबाल 62 आणि लिंटन दास 20 धावांवर बाद झाले. नंतर मुशफिकूर रहिम आणि महमंदुल्लाह यांनी झुंज दिली. रहिमने शतक केले. तर महमंदुल्लाहने शानदार 69 धावांची खेळी केली. पण शेवटी बांग्लादेशला 50 षटकांत 8 बाद 333 धावांपर्यंतच मजल मारता आली अन् त्यांचा 48 धावांनी पराभव झाला.

संक्षिप्त धावफलक -

ऑस्ट्रेलिया - 381/5

डेव्हिड वॉर्नर - 166

उस्मान ख्वाजा - 89

अॅरोन फिन्च - 53

......

बांग्लादेश - 333/8

मुशफिकूर रहिम - 102

महमदुल्लाह - 69

तमिम इकबाल - 62

शाकिब-अल-हसन - 41

सामनावीर - डेव्हिड वॉर्नर

Similar News