Ground Report : जलयुक्त शिवार योजनेतील काम, रोगापेक्षा इलाज भयंकर

रोगापेक्षा इलाज भयंकर अशी एक म्हण आहे. रायगड जिल्ह्यातील एका गावातील शेतकरी ही म्हण प्रत्यक्षात अनुभवत आहेत. पाहा आमचे करस्पाँडन्ट धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2021-10-26 12:23 GMT

कोकणातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व वादळाने अक्षरशः उध्वस्त झालाय. एकेकाळी भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात आता भातशेती धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना अनेकदा शेतकऱ्यांना मारक ठरत आहेत. सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील खांडसई कासारवाडी येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र हा बंधारा शेतकऱ्यांना तारणारा नव्हे तर मारक ठरला आहे. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांची पिकती भातशेती नापीक झालीय. एकेकाळी सोन्यासारखे धान्य देणाऱ्या शेतीत आता दगड गोटे व उंच उंच गवत वाढलेले दिसत आहे.



 

एरवी मोठ्या प्रमाणात उत्पादन देणाऱ्या शेतीत पाणी घुसत आहे, परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय बंधाऱ्यामुळे शेताकडे जाणारे मार्ग देखील बंद झाल्याने शेती असून नसल्यासारखीच अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. शेतकरी व ग्रामस्थांनी पाली सुधागड पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकारी पाली सुधागड यांना निवेदनाद्वारे आपली कैफियत मांडली व न्यायाची अपेक्षा केलीय. जलशिवार योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे काम मंजूर झाले. या योजनेचे टेंडर आर सी पाटील यांनी भरून कामाला सुरुवात केली. यामध्ये दोन हौदाचे काम पूर्ण केले. तसेच तलाव पंप हाऊस व पाटबंधारा सिद्धेश्वर सरपंच यांच्या स्वाधीन केले. यावेळी बांधण्यात आलेला बंधारा इंजिनीअर्सच्या मार्गदर्शनाखाली बांधला गेला नसल्याचा आरोप ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ खांडसई यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. बंधारा निर्माण होतेवेळी गावकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्याची मोठी आशा होती. बंधारा असताना देखील ऐन उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात येथील महिलांची, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत असते. जलयुक्त शिवार योजनेचे काम अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत असल्याची तक्रार खांडसई व कासारवाडी ग्रामस्थांनी केली.

यावेळी आपली व्यथा मांडताना वृद्ध शेतकरी कृष्णा वरगडे म्हणाले की शेतीच्या बाजूला बंधारा बांधला गेल्याने पाण्याचा प्रवाह सभोवतालच्या शेतात शिरतो. नदी शेतात शिरते, त्यामुळे मोठे नुकसान होते. एक वर्षाला जवळजवळ तीन लाखाचे उत्पादन येत होते. मात्र आता तीन वर्षे झाली, आमची भातशेती नापीक झाली आहे. पीक मिळत नाही, दुबार पीक शेती असून काही करता येत नाही, आम्ही सरपंचांना भेटलो ते म्हणतात आज करू, उद्या करू, पुढच्या वर्षी करू मात्र आजपर्यंत काही ठोस पर्याय केला नाही, आज आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलीय. आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.



 


येथील शेतकरी कृष्णा सखाराम गोळे यांना देखील या बंधाऱ्याचा मोठा फटका बसलाय. त्यांनी देखील हतबल होत आपली व्यथा मांडली, "बंधाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बंधारा बांधताना सांगितले होते की थाळ बांधून देऊ, पण अजूनपर्यंत थाळ बांधली नाही की नुकसानभरपाई दिली नाही, बंधाऱ्याने नदीची वाट अडली गेली. आजूबाजूच्या शेतात पाणी शिरून पीकपाणी उध्वस्त झाले."

येथील बंधारा बाधित शेतकरी असलेले राजाराम चव्हाण म्हणाले की "बंधाऱ्यामुळे शेतात पाणी शिरत असल्याने तीन चार वर्षात पीक घेता आले नाही. बंधाऱ्यामुळे शेतात जाण्याची वाट अडली आहे. गुराढोरांना चरण्यासाठी देखील जाता येत नाही. आम्हाला इतक्या वर्षांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे" अशी मागणी त्यांनी केली.

दिव्यांग असलेले ग्रामस्थ चंद्रकांत चव्हाण यांनी देखील बंधाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा पाढा वाचला. त्यांनी सांगितले की, येथील बंधाऱ्याचे काम योग्य पद्धतीने झालेले नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना बंधाऱ्याचा लाभ कमी मात्र नुकसानच अधिक सोसावे लागते आहे. चार वर्षात येथील विकासकामे अपूर्ण आहेत, याला सिद्धेश्वर ग्रामपंचायत जबाबदार आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.



 


राजू वरगडे या शेतकऱ्याने देखील आपला संताप व्यक्त केला. बंधाऱ्यामुळे शेतात पाणी शिरते , त्यामुळे भातशेती करणे कठीण झाले आहे. वर्षाला अडीच तीन लाखांचे नुकसान होते, ग्रामपंचायतीत फेरफटके मारून पाय झिजले. पण केवळ आश्वासनेच मिळाली. कोणती उपाययोजना झाली नाही, बंधारा बांधताना पाण्यापेक्षा मोठी थाल(संरक्षण भिंत) बांधून द्यावी अशी मागणी केली होती, पण त्याकडे लक्ष दिले नाही, बंधारा तोडला तरच आम्ही शेतकरी सुखी होऊ.

खांडसई कासारवाडी येथील ग्रामस्थ गणपतराव सितापराव यांनी येथील विकासकामांवर भाष्य करताना सांगितले, की खांडसई गाव गेली अनेक वर्षे पाणीटंचाईला सामोरे जाते आहे. नळपाणी पुरवठा योजनेत थोडी फार डागडुजी केली जाते. नंतर जैसे थे परिस्थिती होते. योजना व निधी येतो मात्र पाणीटंचाईची समस्या काही सुटत नाही, तसेच बंधाऱ्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या गावचे ग्रामस्थ मनोहर काशीराम जांबुळकर यांनी सांगितले की, जवळपास 30 ते 40 वर्ष खांडसई गाव पाणीटंचाईने त्रस्त आहे. जलशिवार योजनेअंतर्गत पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या. मात्र पाणीटंचाईचा तिढा सुटलेला नाही. मार्च,एप्रिल, मे महिन्यात भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात, महिलांना तीन ते चार किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागते, हे थांबले पाहिजे."

खांडसई कासारवाडीच्या शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारींवर सिद्धेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश यादव यांची देखील प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली, त्यांनी सांगितले की, "सदर बंधाऱ्यांचे काम जलशिवार योजनेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी झाले आहे. बंधाऱ्याच्या साईटबाबत खांडसई ग्रामस्थांनी सुचविलेल्या जागेवरच जुन्या बंधाऱ्याच्या खाली जास्त पाणीसाठा होण्याच्या उद्देशाने नवीन बंधारा बांधला. सदर बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला आरसीसी विहीर बांधण्यात आली. दोन ओढे एकत्र आल्याने पाण्याचा प्रवाह वाढतो आहे व पाण्याचा प्रवाह शेतात शिरून शेतीचे नुकसान होते आहे. मागील दोन तीन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे निधीसाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही आमची भूमिका आहे."



 


येथील रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांच्याकडे आम्ही खांडसई गावाच्या पाणीटंचाईबाबत विचारणा केली असता, "खांडसई गावाकरीता जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना मंजूर व्हावी यासाठी आम्ही सातत्याने जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला आहे. सदर योजनेची निविदा निघेल आणि प्रत्यक्षात काम सुरू होईल असे जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी सांगितले. यासंदर्भात आम्ही गटविकास अधिकारी विजय यादव यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास संपर्क साधला असता ग्रामस्थांच्या तक्रारीचा संदर्भ पाहून पुढील कार्यवाही करू असे त्यांनी सांगितले.

Tags:    

Similar News