Ground Report : आदिवासींच्या जीवाची किंमत नाही का? कुटुंब २ महिन्यांपासून मदतीच्या प्रतिक्षेत

आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे शासकीय यंत्रणेचे कसे दुर्लक्ष होते, हे मॅक्स महाराष्ट्र सातत्याने मांडत आहे. पण आदिवासी बांधवांच्या जीवाची किंमत देखील यंत्रणेला नाही, हे दाखवणारा रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2021-09-11 12:43 GMT

पालघर : घरची परिस्थिती हालाखीची…...पती मानसिकदृष्ट्या सक्षम नाही, पोरगं शिकून आम्हाला चांगलं दिवस आणील, या आशेने आई काबाड कष्ट करून मामाच्या गावाला राहून मुलाला शिक्षण देत होती. दहावी पास झालेला मुलगा लवकरच कॉलेजला जाईल ही आईची आशा.... परंतु या रंगवलेल्या स्वप्नांवर एक दिवस अचानक काळाने घाला घातला. भावेश हा नेहमीप्रमाणे आपल्या शेतात वडाच्या झाडावर मुलांसोबत खेळायला गेला, परंतु तिथे सुरू असलेल्या वीजेच्या मेन लाईनचा शॉक लागून तो झाडावरून खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली व उपचारा दरम्यान नाशिकमध्ये त्याचा मृत्यू झाला.


 एकुलता एक मुलगा गेल्याने या घटनेचा त्याच्या आईवर गंभीर परिणाम झाला आहे, तिला मोठा मानसिक धक्क बसला आहे. ही वेदनादायी घटना आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील भेंडीचापाडा या आदिवासी पाड्यामधील... दहावीत शिकणारा भावेश कृष्णा भुरकूट वय (17) याचा दोन महिन्यांपूर्वी मोखाडा इथून खोडाळ्याकडे जाणाऱ्या नवीन मेनलाईनचा शॉक लागून मृत्यू झाला. परंतु ही घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे घडली असल्याचा आरोप, मृत भावेशच्या नातेवाईकांनी केला आहे.


सरकारकडूनही मदत नाहीच

एकीकडे महावितरणने कोणतीही जबाबदारी घेतलेले नाही, तर दुसरीकडे या अपघाताचा पंचनामा करण्यात आला असला तरी दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही या आदिवासी कुटूंबाना शासकीय मदत मिळालेली नाही. याबाबत मोखाडयाचे तहसीलदार वैभव पवार यांना विचारले असता सदरचे प्रकरण आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाठवले आहे असे त्यांनी सांगितले.


महावितरणच्या अधिकाऱ्याची धमकी

घटनेला २ महिने उलटून गेल्यानंतर दोन ते तीन दिवसांपूर्वी महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र राठोड (नाशिक एक लहरा कार्यालय ) हे पाहणी करण्यासाठी घटनास्थळी आले होते. "यावेळी त्यांनी संताप व चीड आणणारे विधान केले, तुमच्या मुलाची चुक असेल तर मयत मुलावर देखील गुन्हा दाखल होईल, असे त्यांनी आम्हाला सांगितले" असल्याचे मयत भावेश याचे मामा सुरेश वांगड यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.


रवींद्र साळवे त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर मोखाडयाचे कार्यकारी उपअभियंता मनोहर जाधव यांना विचारणा केली, त्यावेळी राठोड यांचे असे वक्तव्य चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच संबंधित कुटुंबाला मदतीची प्रक्रिया सुरू आहे, पंचानामा करुन चूक ठेकेदाराची आहे की महावितरणची या तपास केला जाईल, त्यानंतर मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.



 सदरची घटना महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे घडलयाचा आरोप झाला आहे. आतापर्यंत महावितरणाचे कर्मचारी किंवा ठेकेदार एजन्सीने एकदाही या कुटूंबियांच्या घरी भेट दिलेली नाही. या आदिवासींच्या जमिनीतून ही लाईन गेली असताना, या कुटूंबाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेत वीज सुरू करणार आहोत याची येथील ग्रामस्थांना पूर्व कल्पना देण्यात आली नाही, गावा बाहेरून लाईन घ्या या असेही येथील ग्रामस्थांनी ठेकेदाराला बजावल्याचे सांगितेल आहे. पण ठेकेदाराने ग्रामस्थांचे ऐकले नाही, तसेच वीजेच्या लाईनला स्पर्श होणाऱ्या झाडांची छाटणी देखील केली नसल्याने, भावेशचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत भावेशचे मामा सुरेश वांगड यांनी केला आहे. तसेच पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी ही लाईन येथून तात्काळ हलवून गावा बाहेरून न्यावा आणि पीडित कुटूंबाला जगण्यासाठी तात्काळ मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Similar News