काँग्रेसनं जाणिवपूर्वक ईशान्य-पूर्वचा विकास केला नाही

Update: 2023-08-10 15:21 GMT

केंद्र सरकारवरील अविश्वास प्रस्तावाला उत्तर देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या सत्ताकाळातील तीन महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.

मोदी म्हणाले, 5 मार्च 1966 रोजी मिझोराममधील असहाय नागरिकांवर हल्ला करण्यासाठी काँग्रेसला हवाई दलाकडून हल्ले करावे लागले होते. मिझोरामचे लोक भारताचे नागरिक नव्हते का म्हणून काँग्रेसने निष्पाप नागरिकांवर हल्ले केले होते. आजही 5 मार्चला संपूर्ण मिझोरममध्ये शोक दिवस पाळला जातो. काँग्रेसने हे सत्य देशवासियांपासून लपवलं आहे. मिझोरमच्या नागरिकांची ती जखम भरण्याचा प्रयत्नही कधी काँग्रेसनं केला नाही. त्यावेळी इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या, असा आरोप मोदींनी यावेळी केला.

मोदींनी यावेळी आणखी एका घटनेचा उल्लेख केला. ती घटना होती भारत Vs चीन युद्धाच्या वेळची. ते म्हणाले, “ 1962 ची ती घटना आहे. ते भितीदायक प्रसारण लक्षात ठेवा. चीनकडून देशावर हल्ले होत होते. लोकांना केंद्रातील काँग्रेस सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. अशा कठीण काळात पंडित नेहरू म्हणाले होते की, माझे हृदय आसामच्या लोकांसाठी जाते. नेहरूंनी तिथल्या लोकांना त्यांच्या नशिबावर जगायला सोडलं होतं, असा आरोपच मोदींनी थेट नेहरूंचं नाव घेऊन केला.

आणि तिसऱ्या घटनेचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसचा ईशान्य-पूर्वेकडील राज्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कसा सुरूवातीपासून नकारात्मक होता हे दाखवण्यासाठी त्यांनी राममनोहर लोहिया यांनी नेहरूंबाबत केलेल्या वक्तव्याचा आधार घेतला. मोदी म्हणाले, “ जे स्वत:ला लोहियांचे वारसदार ठरवतात. लोहिया यांनी नेहरूंवर आरोप करत म्हणाले की, नेहरू जाणूनबुजून ईशान्येचा विकास करत नाहीत. ती जागा सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित राहिली आहे. मोदी पुढे म्हणाले की, ज्या ठिकाणी लोकसभेच्या एक-दोन जागा होत्या त्याकडे काँग्रेसने लक्ष दिले नाही. पण आमच्यासाठी ईशान्य म्हणजे यकृताचा तुकडा आहे. ईशान्य, मणिपूरमधील सद्यस्थितीला काँग्रेसच कारणीभूत असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी केली.

Tags:    

Similar News