दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, विविध ठिकाणी आंदोलन

Update: 2020-07-21 09:19 GMT

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढी साठी केलेले आंदोलन आता चांगलेच पेटले आहे. संघटनेने मंगळवारी दूध बंद आंदोलन घोषित केले होते. यानंतरही मुंबईला जाणारी दूध वाहतूक सुरू होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यात येलुर निमशिरगाव, कसबे डिग्रज तसेच कवठे महांकाळ या ठिकाणी टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले आहे.

म्हैस तसेच गायीच्या दुधाला प्रत्येकी दहा रुपयांनी दरवाढ द्यावी आणि परदेशातून दुधाची भुकटी आयात करणे थांबवावे या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत प्रत्येक टँकर फोडला जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी चक्क बैलांना दुधाची आंघोळ घालुन आंदोलन केले आहे.

सरकारने दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे, दुध पावडरला प्रति किलोला ५० रुपये अनुदान द्यावे, तूप, दूध पावडर व बटर यावरील जीएसटी कमी करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. दुसरीकडे बुलडाण्यात स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि कार्यकर्त्यांनी दुधाने अंघोळ करून हे आंदोलन केलं....सोबतच घरोघरी जाऊन अनेकांना दूध वाटप केलंय.

दुसरीकडे याच मुद्द्यावरुन अकोले, अहमदनगर इथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झालीये. दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध कऱण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या. दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा. या प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Similar News