धार्मीक स्वातंत्र्य चळवळीचे नवे रुप - भाग २

Update: 2017-07-07 07:51 GMT

अंबाबाई मंदिराची वहिवाटीची सनद करवीर छ.संभाजीराजे दुसरे यांनी रामचंद्र भट यांना दिली. त्यांचे दत्तक नातू भालचंद्र प्रधान यांच्याकडे हा मान असणे आवश्यक होते. पण त्यांच्या अज्ञानाच, गरिबीचा गैरफायदा घेऊन मुनीश्वर पुजाऱ्यांनी त्यांचा हक्क बळकावला. याबाबतचा पुरावा शंभूराजे यांच्या काळातील तीन सनदा, मंदिराचे जाप्तेबुक यामध्ये आढळतो.

श्री.शंभूराजे अर्थात संभाजीराजे दुसरे यांनी १८४६ मध्ये नरहरी भट सांगावकर सनद (क्रमांक-९४७) दिली होती. तसेच शिदोजी हिंदुराव घोरपडे यांना श्रीमूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेसंबंधीची सनद दिली होती. श्रीपूजा करून राज्याचे कल्याण चिंतावे असे सूचित करण्यात आले. त्यांना काही गावे इनामही देण्यात आली. या सनदावर वहिवाटदार म्हणून रामचंद्र भट प्रधान यांचा उल्लेख आहे. त्यांचे वंशज श्रीपाद प्रधानांनी १९५४ मध्ये आपल्या भाचीचा मुलगा भालचंद्र यास दत्तक घेतले. त्यावेळी श्रीपाद प्रधान हे ८५ वर्षाचे होते तर भालचंद्र ७ वर्षाचे होते. दत्तक विधानानंतर पंधरा दिवसातच श्रीपाद यांचे निधन झाले. भालचंद्र अज्ञान असल्याने मंदिराच्या व्यवस्थापनाचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. या सगळ्याचा फायदा घेत मुनीश्वरानी आपल्याला सोयीस्कर असा निकाल लावून घेतला. भालचंद्र प्रधान सज्ञान झाल्यानंतर त्यांनीन पुन्हा पूजेचे अधिकार मागितले. मात्र, मुनीश्वरांनी त्यांना दाद दिली नाही. अनेक वर्ष न्यायालयात जाऊनही दाद मिळेना आणि आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाल्याने त्यांनी या विषयाचा नादच सोडला. आजही भालचंद्र प्रधान जिवंत असून ते वयोवृद्ध आहेत.

शंभूराजेंच्या काळातही मंदिरातील संपत्तीची रोजनिशी लिहिली जात होती. १८६६ च्या श्री करवीर निवासनीच्या जाप्तेबुकमध्ये मंदिरात देवीला अर्पण होणाऱ्या साड्या, खण, नारळ, अलंकार या सगळ्यांची नोंद केली जात होती. या नोंदी रामचंद्र भट प्रधान हे सहीनिशी हुजूर सरकारला सादर करत होते. ही संपत्ती त्याकाळातही सरकार खजिन्यात जमा होत होती.

सनदेमध्ये अंबाबाई असाच उल्लेख

छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या काळापासून देण्यात आलेल्या सनदांमध्ये देवीचा उल्लेख करवीर निवासिनी असा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ८ नोव्हेंबर १९४९ व दि. १४ जानेवारी १९५० मध्ये दिलेल्या पत्रामध्ये श्री. अंबाबाई टेंपल असा उल्लेख आहे. याचा अर्थ अंबाबाई हेच नाव असल्याचे स्पष्ट होते.

६ हजार कोटींचा भ्रष्टाचार?

अंबाबाई मंदिरात लाखो भाविक येत असतात. मुक्तहस्ते देणगी देत असतात. केवळ नवरात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांनी १०० रु दान केले, असे गृहीत धरले, तर ६ हजार कोटी रुपये जमा होतात. नऊ दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सामाजिक समतेची परंपरा

छत्रपतींनी दिलेल्या सनदेमध्ये सामाजिक समता स्पष्टपणे दिसते. करवीर निवासनीचं उत्सव ब्राह्मणांनीच नाही तर हिंदू, मुस्लिमांसह सर्व जातींना एकत्रित करावा. तसे न केल्यास त्यांना स्वधर्माचे पातक लागेल. यावरून छत्रपती घराण्याने जपलेली सामाजिक समतेची परंपरा अधोरेखित होते.

 

नोट – वरील लेखातील मुद्दे हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. ‘मॅक्स महाराष्ट्र’ लेखकाच्या मतांशी पुर्णतः सहमत असेलच असे नाही.

Similar News