मार्लोन ब्रान्डो : माणूसपणाची भूमिका घेणारा सच्चा कलावंत !

Update: 2020-07-01 06:23 GMT

अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव ! भारतीय रुपेरी पडद्यावरचा पहिला अंग्री यंग मॅन ! अन्यायाविरोधात चिडून उठणारा ! अर्थात हे चिडणं शूटींगपुरतंच.‌ प्रत्यक्षात तो तडजोडीचं बचावात्मक आयुष्यच जगला.

वर्तमानस्थितीत तर अमिताभ बच्चन सत्ताधारी राजकीय पक्षाकडून आलेले अतार्किक मजकूर, फोटोज ट्वीट करताना दिसतो. पाच-सहा वर्षांपूर्वीच पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात प्रतिक्रिया देणारा अंग्री यंग मॅन आज हुं की चूं करीत नाही. हे सगळं आठवायचं कारण की आज हाॅलिवूडमधला गाजलेला अभिनेता मार्लोन ब्रान्डोचा स्मृतिदिन आहे.

थोडं विचित्र वाटलं असेल की अमिताभ बच्चनने झालेली सुरुवात मार्लोनवर कशी व का आली असेल ! तुलना नेमकी कसली ? अभिनयाची, यशाची की कलावंतातल्या आत लपलेल्या माणसाची ?‌

हे ही वाचा..

मार्लोन ब्रान्डो. विसाव्या शतकातलं हाॅलिवूडमधलं एक असं नाव ज्याचा त्या सिनेसृष्टीवर दीर्घकालीन प्रभाव राहिला. साठ वर्षे मार्लोन सिनेसृष्टीत वावरला. त्या कारकीर्दीत त्याच्या नावावर दोन ऑस्कर जमा झाली. पण दुसऱ्यांदा जेव्हा मार्लोनला ऑस्कर घोषित झालं, त्याने ते विनम्रपणे तितक्याच स्पष्टपणे नाकारलं.

मार्लोन नुसताच अभिनेता नव्हता. तो मानवी हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ताही होता. त्याचं दु:ख होतं की ज्या स्वातंत्र्य आणि न्यायाचा पुरस्कार अमेरिका करते, तेच मौलिक अधिकार नेटिव अमेरिकन्स अर्थात जे गोरे नाहीत, त्यांना का नसावेत ? आपली सिनेसृष्टी वांशिक, धार्मिक भेद का करते ? ती इतरांना तुच्छतापूर्वक का वागवते ?

मार्लोनचा गाॅडफादर जगात करोडोंच्या ह्रदयावर कोरलेला आहे. १९७३ मध्ये आलेल्या या सिनेमात मार्लोनने असा काही गाॅडफादर साकारला होता की हे जवळजवळ निश्चित होतं की ऑस्कर मार्लोन ब्रान्डोलाच जाणार ! झालंही तसंच. पण ऑस्कर स्वीकारायला मार्लोन मंचावर गेला नाही. त्याने तो खेदपूर्वक पुरस्कार नाकारला होता.

पुरस्कारासाठी मार्लोनच्या नावाची घोषणा झाली तेव्हा मंचावर पोहचली नेटिव अमेरिकन्स च्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती साशीन लिटलफिदर ! तिने जेव्हा घोषित केलं की सिनेसृष्टीत नेटिव अमेरिकन्स आणि इंडियन्स यांना जी वागणूक मिळते आणि त्याचं जे अपमानास्पद चित्र पडद्यावर रंगवलं जातं, त्याचा निषेध म्हणून मार्लोनने पुरस्कार नाकारलाय, तेव्हा उपस्थितांना मोठा धक्का बसला, पण त्याचवेळी समर्थनार्थ टाळ्यांचा कडकडाटही झाला.

मागाहून मार्लोनने पुरस्कार नाकारण्यामागची आपली भूमिका एका मुलाखतीत स्पष्टही केली होती. तो म्हणाला होता की इथल्या सिनेमांत चीनी, जापानी, भारतीयांचं चित्र त्यांच्या वाईट प्रतिमा बनवणारं असतं. क्रूर, जंगली, गुलाम, व्यसनी असंच त्यांचं पात्र रंगवलं जातं. स्वत:ला तसं पडद्यावर पाहताना त्या कलावंतांना काय वाटत असेल, आपण समजू शकत नाही. वर्षेनुवर्षे या वेदनेची त्यांना सवय झाली असेलही ; पण त्यांच्या मुलांचं काय ? ती स्वत:च्या वंश, वर्ण, धर्माची तीच वाह्यात प्रतिमा आयुष्यभर पाहत मोठी होत असतात.

मार्लोनच्या मांडणीतून एक स्पष्ट होतं की त्याचं ऑस्कर नाकारणं नाटकी नव्हतं. उलट त्याने भेदभावाविरोधातील असंतोषाला वाट करून दिली होती. कारण त्यानंतर भेदभावाचा निषेध म्हणून पुरस्कार नाकारल्याची अनेक उदाहरणं हाॅलिवूडमध्ये तयार झाली.

अशी हिंमत अमिताभ बच्चनसारखा कलावंत कधी दाखवू शकेल काय, साशंकता आहे. गेल्या सहा वर्षांत भारतात भल्या भल्या कलावंतांनी एकशे ऐंशी कोनात पलटी मारलीय. एखाद्या राजकीय पक्षाचं समर्थन करणं अयोग्य नाही, पण अनुपम खेर, परेश रावल, अक्षयकुमार अशी कितीतरी नावं घेता येतील, जे लोक सत्ताधारी राजकीय पक्षाची खूशमस्करी करताना दिसतात. भारतातील दिवे इव्हेन्टनंतर नासाचं छायाचित्र म्हणून अमिताभने केलेल्या ट्वीटचं उदाहरण देता येईल. एकतर ही मंडळी बोलायला घाबरतात किंवा ते मेहेरबानीच्या ओझ्याखाली तरी आहेत !

जगात पडद्यावर गाजलेल्या भूमिका साकारणारे खूप कलाकार असतीलही; आपल्याकडेही आहेत, पण प्रत्यक्ष आयुष्यात सामाजिक विषयांवर भूमिका घेणारे विरळाच ! मार्लोन ब्रान्डोसारखे कलाकार म्हणूनच जगात ठसठशीतपणे उठून दिसतात !

-राज असरोंडकर

Similar News