‘बहिष्कृत आवाजाचे गोंगाट’

Update: 2019-11-19 10:51 GMT

जागतिक खपाची सगळीचं मीडिया हाऊसेस 'ब्लॅक हिस्ट्री मंथ' साजरा करतात. ब्लॅक समूहाच्या एकूणच कल्चरल असर्शनची नोंद त्यांना घ्यावीचं लागते, इतक्या ताकदीने त्यांनी आपलं सांस्कृतिक राजकारण उभं केलंय. त्यासाठी ब्लॅक समूहाला मनापासून दाद द्यावीच लागेल.

यंदा न्यूयॉर्क टाईम्सने एक अफलातून प्रयोग केलाय. प्रोजेक्ट 1619 नावाने. इसवी सन 1619 साली उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्यावर आफ्रिकन गुलामांचं पहिलं जहाज आलं होतं. त्या घटनेला यंदा चारशे वर्ष पूर्ण झाली आहेत. तिथून सुरू झालेली गुलामांच्या खरेदी विक्रीची अमानुष प्रथा, त्यानंतर ब्लॅक समूहावरचे अनन्वित अत्याचार त्या विरोधात संघटित होऊन उभ्या ठाकलेल्या ब्लॅक पँथर, सिव्हिल राईटस सारख्या चळवळी. हा सारा विद्रोही लढा अमेरिकेच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.

या लढ्याची आठवण म्हणून, शोषितांच्या ऐतिहासिक उठावाचा लेखाजोखा आजच्या काळात व्हावा म्हणून, आजच्या पिढीला पण रेसिझम समाजात कसा काम करतो आणि व्हाईट प्रिव्हलेज काय असतं याची जाणीव व्हावी म्हणून हा प्रोजेक्ट न्यूयॉर्क टाईम्सने यंदा सुरू केला आहे.

जिवंत माणसांना गुलाम म्हणून अमेरिकन समाजानं कसं वागवलं, सिस्टम्याटीक ऑप्रेशन मधून आजवर किती अनन्वित अन्याय अत्याचार त्यांच्यावर केले आहेत. याची जाणीव आणि त्याबद्दल मनात माफी बाळगणारा व्हाईट लिबरल वर्ग तिथं बऱ्या पैकी अस्तित्वात आहे.

तो वर्ग आपलं व्हाईट प्रिव्हलेज मान्य करतो, व्हाईट सुप्रीमसी कशी सिस्टम्याटिक काम करते. हे पण मान्य करतो. नुसतं ऍक्नॉलेजचं करत नाही तर ब्लॅक समूहाच्या लढ्यात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं टाकतो. पुरोगामीत्व असं असतं. नाहीतर आपल्याकडं शोषक मीच, मुक्तीदाता मीच, माध्यमं मीच, नेता मीच याच डिकोर्स मध्ये इथला सवर्ण पुरोगामी वर्ग आपलं स्टेटस को. कास्ट प्रिव्हलेज अबाधित ठेवत सुधारणेच्या गप्पा मारत असतो. असो.

तो सगळा अंक वाचून झाला. आपल्याकडं कधी होणार असं? किती काही सांगण्यासारखं आहे. इथल्या दलित बहुजनांकडं. आपलं अस्तित्व क्लेम करण्यासाठी उभारलेले किती पँथर पासून ते रोहित वेमुला पर्यंतची आंदोलनं, चळवळी, लढे आहेत. जलसे, भीमगीतांसारखी किती विद्रोही कला आहे. प्रस्थापित साहित्याला मोडीत काढणारं जागतिक दर्जाचं दलित साहित्य आहे. टॉनि मॉरिसन म्हणतात तसं

‘आमचं अख्खं अस्तित्व, नुसतं जिवंत असणं एक क्रांतिकारी बंड आहे.’

आपल्याकडची सो कॉल्ड पुरोगामी माध्यमं स्वतःचं 'कास्ट प्रिव्हलेज' मान्य करून या दाबलेल्या आवाजांना स्थान देतील काय? दलित बहुजनांनी काही नॅरेटिव्ह मांडाल तर डीनायल, डिफेन्सिव्ह न होता आमचं म्हणणं ऐकून घेतील का? 'हिंदुत्व की हिंदू' ह्या बायनरीतून बाहेर येत कमीत कमी यावर संवाद तरी सुरू करतील का?

बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह, गोलमेज परिषदा, नागपुरचं धर्मांतर या घटनांना मानव मुक्तीचा समग्र दस्तऐवज म्हणून खुल्या दिलानं सेलिब्रेट करतील काय? किंवा नंतरच्या काळातील आंबेडकरी चळवळीतल्या दलित पँथर पासून खैरलांजी ते खर्डा पर्यंतच्या अन्याया विरोधातल्या, सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षात इंटलेक्च्युअल ऑनेस्टीने पाठीशी उभं राहिलेत किंवा राहतील का? कोणी पुरोगामी हे वाचत असला तर बघ बाबा, नाहीतर नावा पुरतं आंबेडकर आणि डोक्यात तेच गांधी की गोडसे नाही चालणार.

त्यांनी करो अथवा न करो, आपल्याला अशा पद्धतीच्या मांडणीची नितांत गरजयं. आजची आंबेडकरी तरुणपिढी आपापल्या परीने साहित्य सिनेमा पासून ते थेट मिम्स च्या माध्यमातून आपलं सांस्कृतिक राजकरण रेटत आहे. नवनवी मांडणी करत आहे. यावर अजून प्रचंड काम होणं गरजेचं आहे. खूप लांबचा पल्ला गाठयचा आहे. आपल्या बहिष्कृत आवाजाचे गोंगाट सर्वदूर पोहोचयाचे आहेत.

#साचलेलागुंता

Similar News