Dr. Madhav Gadgil : एखाद्या विषयाला परिपूर्ण न्याय कसा द्यायचा याचं एक अनुकरणीय उदाहरण !
डॉ. माधव गाडगीळ यांच्या पश्चिम घाट जैव विविधता अहवालात काय होतं? खरा-खुरा विकास म्हणजे काय ? डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांचा लेख
Western Ghats Biodiversity Report डॉ. माधव गाडगीळ Dr. Madhav Gadgil सरांचा पश्चिम घाट जैव विविधता अहवाल शासनाला सादर झाला होता पण तो शासनाकडून जाहीर होत नव्हता त्या काळात एस एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्या फिरत्या व्याख्यानमालेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी आम्ही सरांची सहा व्याख्याने आयोजित केली होती. श्रीराम वाचनालय सावंतवाडी, नाथ पै सेवांगण मालवण, गोपुरी आश्रम कणकवली यांच्या सहकार्याने ही सहा व्याख्याने झाली होती.
विकास : निसर्गाच्या कलाने आणि लोकांच्या साथीने असा विषय या व्याख्यानांसाठी सरांशी चर्चा करून ठरवला होता. मी सरांना विनंती केली होती की, व्याख्यान झाल्यावर त्या विषयाबाबत काही मुद्दे वाचकांच्या हातात रहावेत म्हणून आपण एक छोटे पुस्तक छापून प्रत्येक व्याख्यानाच्या वेळेस विकूया. सरांनी दहा दिवसात पुस्तकाचा मजकूर लिहून दिला आणि आम्ही आठ दिवसात तो रंगीत मुखपृष्ठासह छापून घेतला. सहा ठिकाणच्या व्याख्यानामध्ये साधारण सहाशे पुस्तके विकली गेली.
सर्व ठिकाणी सरांनी साध्या सोप्या भाषेत पर्यावरण संवर्धन आणि विकास या परस्परविरोधी संकल्पना नसून नियोजन प्रक्रियेत लोकांना सामावून घेतलं तर निसर्ग संवर्धन करताना खरा विकास साधला जाऊ शकतो हे ठामपणे लोकांना समजावून सांगितले. प्रत्येक ठिकाणी श्रोत्यांच्या प्रश्नांना सरांनी उत्तरे दिली. मालवण सारख्या ठिकाणी काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारताना विरोधी मताचा आग्रह धरण्याचा प्रयत्न केला पण संयोजकांनी आणि सरांनी संयमाने परिस्थिती हाताळली. सरांचा पश्चिम घाट जैव विविधता अहवाल शासनाने जाहीर केला नव्हता आणि त्याचमुळे तो विषय कोकणात चर्चेचा आणि संवेदनशील विषय बनला होता. अशा काळात ही व्याख्यानमाला झाल्याने माध्यमांनी सरांच्या मांडणीला भरपूर प्रसिद्धी दिली. त्या तीन दिवसातील सरांचा सहवास मला व्यक्तीश: खूप अनुभव समृद्ध करून गेला. एखाद्या विषयाला वाहून घेऊन त्या विषयाला परिपूर्ण न्याय कसा द्यायचा याचं माधव गाडगीळ सर हे एक अनुकरणीय उदाहरण आहे.
सर आज गेले. सरांच्या स्मृती कायम सोबत राहतील.
- सुभाष वारे