मुली पेटतायत महाराष्ट्र का पेटत नाहीये?

Update: 2020-02-05 05:14 GMT

हिंगणघाट, औरंगाबाद, मीरारोड... पोरीबाळींना पेटवून देण्याच्या एका मागून एक घटना घडतायत. हिंगणघाटच्या घटनेने तर सगळ्यांना धक्काच बसला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात, महिला धोरण राबवणाऱ्या महाराष्ट्रात हे काय सुरूय ? ही जर महाराष्ट्राची मानसिकता असेल, ही मानसिकता जर गावोगावी-खेडोपाडी रूजली असेल तर धक्कादायक आहे.

या राज्याचा पुरोगामी वारसा, संतपरंपरा, छत्रपतींचा आदर्श सगळंच फेल झाल्यासारखं वाटतंय. या मानसिकतेच्या विरोधात महाराष्ट्र पेटून का उठत नाहीय! महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतेय. कायदा सुव्यवस्थेबरोबरच हा मूल्यशिक्षणाचाही मुद्दा आहे.

महिलांचा सन्मान करण्याची वृत्ती नष्ट होत चाललीय का असा प्रश्न पडावा इथपर्यंत परिस्थिती गंभीर झालेली आहे. एखाद्या समाजाची किती प्रगती झालीय याचा अंदाज तिथल्या महिलांच्या परिस्थितीवरून येतो या निकषावर महाराष्ट्र नापास झाला आहे. महिला अत्याचाराच्या मुळावर म्हणजे पुरुषी मानसिकतेवर घाला घालण्याची गरज आहे.

घरगुती हिंसेच्या प्रकरणांमध्ये अत्याचार करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असतो, मात्र बहुतांश अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पुरुषी मानसिकता हावी दिसते.

महिला अत्याचाराच्या घटना रोखायच्या असतील तर मुलांमध्ये जागृती करणं गरजेचं आहे. महिला उपभोग्य वस्तू नाही, त्यांना नाही म्हणण्याचा अधिकार आहे, नो मिन्स नो या सर्व गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत. महिला अत्याचाराच्या कोर्टात प्रलंबित केसेस म्हणजे सुद्धा महिला अत्याचाराचं विस्तारित स्वरूप आहे.

प्रत्यक्ष अत्याचार आणि कोर्टातलं कामकाज यामध्ये तुलना केली तर कोर्टातली प्रक्रिया जी कधी कधी जास्त जीवघेणी वाटते. पिडीतांचं मानसिक खच्चीकरण हा मुद्दा फारसा चर्चेत येत नाही, पण सर्वेक्षण केलं तर मिळालेल्या न्यायावर समाधानी असल्याचं किती पिडीत सांगतात हे लक्षात येईल.

प्रशासन, कायदेमंडळ, न्यायपालिका इतकंच काय माध्यमांमध्येही असलेलं महिलांचं प्रमाण आणि निर्णय प्रक्रियेत असलेला सहभाग पाहिला तर आजच्या समाजाची नेमकी परिस्थिती समजून येईल.

महिलांना सन्मान देण्याची वृत्ती किंवा संस्कार घरात झाला पाहिजे शाळेत वाढला पाहिजे आणि समाजात अंवलंबला गेला पाहिजे. हे असं झालं तरच महिलांना दुय्यम स्थान देण्याची, त्यांच्यावर अत्याचार करण्याची पुरूषी मानसिकता आटोक्यात येईल. हा महाराष्ट्र म्हणजे तालिबान नाही याचा कडक संदेश सर्वदूर द्यायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे.

तुमची आई-बहिण-मुलगी-मैत्रिण जाळली जात असेल या समाजात तर इतकं लक्षात घ्या चूक तर तुमचीही आहे. गुन्हेगार फक्त पेट्रोल - रॉकेल- ॲसिड टाकणाराच नाही तर तुम्हीही गुन्हेगार आहात. मुली पेटतायत, तुम्ही ही पेटून उठलं पाहिजे, हा महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे

Similar News