संख्याबळाचा जनतेच्या मताने (हिताचा) अन्वयार्थ! पण छापणार कोण?

Update: 2019-11-04 05:52 GMT

दिवाळीपूर्वी राज्यात निवडणुकांचे निकाल हाती आले त्यामुळे दिवाळीनंतर नव्या सत्तांतराच्या प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. पण निकाल लागून आठवडा झाला तरी त्या अपेक्षीत गतीने सत्तेवर पुन्हा येण्यासाठी आतूर असलेल्यांच्या चर्चा आणि वाटाघाटी मध्ये खारटपणा अजून काही कमी झाल्याचे दिसले नाही. मतदारांनी आयाराम गयाराम करत इकडून तिकडे जाणा-या सगळ्याच नेत्यांना धडा शिकवला आहे. महाजनादेश दिला आहे की तुमचे पक्षीय राजकारण जनतेच्या हिताचे आहे की स्वत:च्या पक्षांच्या आणि नातेवाईकांच्या हिताचे ते सांगा.

या जनादेशाचा वेगळा अन्वयार्थ माझ्या एका सामान्य मतदार असलेल्या मित्राने मला सांगितला. पेशाने लेखापरीक्षक असलेल्या या मित्राचा फोन आला. तो म्हणाला, ‘काय पत्रकार, होतोय का नाही तुमचा संख्याबळाचा खेळ पूर्ण?’ मी म्हटले, ‘नाही हो कसला काय? अन फाटक्यात पाय! मतदारांनी त्रिशंकू विधानसभा दिली आहे.’ शंभर आहेत तो पन्नासची वाट पाहतोय आणि ९८ अधिक अपक्ष आणि तुम्ही आणि आम्ही म्हणत दुसरा एकगट सुध्दा त्याच पन्नासवाल्यांना म्हणतो ‘करा की तुमच्या मनासारखं, म्हणजे होवू द्या आमच्या आणि जनतेच्या मनासारखही होईलच की!’

माझा मित्र म्हणाला, ‘अरे निवडणुकांच्या आधी ज्यांनी कमरेचे सोडून डोक्याला बांधल्यासारखे कॉंग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रवेश दिले त्यांना आता जनतेचा आदेश समजून केवळ जनतेच्या प्रश्नासाठी एकदा शंभर अधिक ९८ करायला काय अडचण आहे? नाहीतर तरी तुमचा ‘सर्वपक्षसमभावाचा धुडगूस आम्ही सहन केलाच’ की निवडणूकांच्या आधी तेव्हा ‘तुम्हाला सत्तेसाठी कुणीही’ चालत होताच ना? मग आता कसले सोवळे झाल्याचा आव आणत आहेत? मी म्हटले ‘खरे आहे मित्रा, तुझ्या धंद्यात बेरीज वजाबाकी संख्या सरळपणे मांडता येतात आणि त्यांचे निकष आणी निष्कर्ष ठरलेले असतात. पण राजकारण म्हणतात याला ईथे आता कॉंग्रेस राष्ट्रवादी नाही चालत, त्यांचे नेते संख्याबळ घेवून आले तर मात्र चालतीलही! पण जनतेच्या प्रश्नावर तिच्या जनादेशाचा वेगळा अन्वयार्थ तू म्हणतोस तसा सरळ कुणाला नकोच आहे? कारण त्यांच्या पक्षाभिनेवशाच्या सोयीचा नाही रे गड्या!

‘वा वा तुम्ही पत्रकार त्यांना सांगा की मग हा जनतेच्या मनातला अन्वयार्थ.’ माझा मित्र भाबडेपणाने म्हणाला, ‘अरे निवडणूकांच्या आधी पश्चिम महाराष्ट्रात तीनदा पूर येवून गेला त्यात किती नुकसानी झाली यांच्या आकड्यांची चर्चा सुध्दा कुणी करत नाही मदत तर नाहीच, वीज अंगावर पडून गेल्या महिनाभरात शेकडोजण बळी गेले आहेत त्यांच्या आकड्यांची चर्चा चिंता कोण करत नाही. अवकाळीत शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्याची सत्तांतराचे आकडेमोड करणाऱ्यांना काय चिंता दिसत नाही. कोकणात वादळ येवून नुकसान झाले ते नव्याने मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने बघणारे तिकडे जाणार होते पण ‘सत्तेची सुपारी फोडायचा निरोप’ आला आणि त्यांनी शेतक-यांच्या पाहणीचा दौराच रद्द केला! नाहीतर ‘ते मेलेच आहेत त्यांचे आकडे आता सावकाश पाहू काय घाई नाही’. तशी घाईतर गेल्या आठ दिवसात नव्हतीच आणि पुढच्या आठ तारखेपर्यंत नाहीच की पण जनतेच्या नुकसानीच्या आकड्यांपेक्षा सत्तेच्या साठमारीच्या आकड्यांना जास्त भाव आहे की राव!

सत्ताधारी पक्षाचे कपडे घालून ऐन निवडणूक प्रचारा दरम्यान एका शेतक-याने आत्महत्या केली. तर मुख्यमंत्री साहेबांना विचारले त्याच्या मदतीचे काय? ते म्हणतात की, “त्या मृताच्या बायकोने लेखी जबाब दिला आहे की नवरा बायकोच्या भांडणात त्याने आत्महत्या केली आहे. शेतकरी आत्महत्या म्हणाली असती लाख रूपये मिळाले असते बिचारीला. पण ती बाई खरे बोलली बिचारी.” पण भांडण नवरा भाजपात प्रवेश घेण्यावरून झाले होते का!? कारण मयताच्या अंगावर भाजपचे कपडे कसे होते? याचे उत्तर काही या जबाबातून मिळालेच नाही. या आकडेवारी आणि तपशिलात कुणालाही जायचे नाही.

माझ्या मित्राचा संताप मला दिसत होता त्याचे खरे खुरे मत कुणाला पटणारे दिसत नाही, कुणाला छापावेसे वाटले नाही कारण ते छापून ‘पँकेज’चा आकडा घालवण्याची तयारी कुणाची आहे? म्हणून त्याच्या मताची किंमत काहीच नाही. पण निवडणूकांच्या आदल्या दोन दिवसांत कसे मतांच्या खरेदीचे व्यवहार झाले त्याचे आकडेवारी आणि रम्यकथा आता खाजगीत सांगितल्या जात आहेत. भाजप कडून बंडखोरांचे ‘लाड करून आणि त्यांना प्रसाद’ पोहोचेल अशी व्यवस्था करूनही अपेक्षीत आकडे काही जमविता आलेच नाहीत. नवनिर्वाचीत अपक्षांच्या खरेदीचे दर मुंबईच्या सध्या सुरू असलेल्या घोडेबाजारात खाजगीत चर्चीले जात आहेत. पण ‘बातमी नाही छापायची हं.’ कारण आमची पत्रकारीता बटिक झाली आहे. त्यांच्या व्यवहाराच्या बातमीत लोकांना काय करायचे आहे? असा जनहिताचा प्रश्न पत्रकार मित्रच विचारून बाजूला करत आहेत!

तर असे भवती न भवती होत राज्यात युतीचेच सरकार स्थापन होणार आहे. फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत, ‘न ठरल्याप्रमाणे सत्तेचे वाटप’ झाल्यास पुढील ५ वर्षात महाराष्ट्रात स्थिर सरकार असेल असा आमचा प्रयत्न असेल, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपकडे १४५ आमदारांचे संख्याबळ असेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर त्यांचे स्वागतच करू.’

राऊत असे काही बोलतात की ‘डाऊट’ आल्याशिवाय राहात नाही. मग वाहिन्यांची गु-हाळे चिपाड होईपर्यंत सर्वांगांनी त्याचा भुगा पाडतात. मग चर्चेला उधाण आले की ‘निम्या निम्या मंत्रीपदावर अडून राहिलेल्या शिवसेनेची आजची भूमिका नरमल्याचे दिसत आहे’. अरे पण ही भुमिका गरमल्याचे काम आपणच केले नाही का चरकात घालून घालून?! ‘अशी चर्चा आहे, तशी चर्चा आहे, सूत्रांनी हा फॉर्म्युला दिला तो दिला’ मग ‘चर्चा माध्यमांसमोर करणार नाही’ असेही कुणी मध्येच म्हणतात. मुख्यमंत्र्याच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात तर माध्यमांच्या कँमेरांवर बंदी आली, मोबईल वापरावर बंदी घालण्यात आली, कारण ते समान वाटपाचे जुने व्हिडिओ नको तेव्हा दाखवितात म्हणे! मग सत्तावाटपाची चर्चा माध्यमात तर जास्त सुरू आहे. प्रत्यक्षात तर केवळ ‘याला घे त्याला घे’ ‘याला आण त्याला आण’ सुरू आहे. कारण राज्यात युतीचेचं सरकार येणार आहे. त्यात फक्त ठरल्याप्रमाणे सत्तेची विभागणी व्हावी, अशी अपेक्षा आहे. जनतेने दिलेले बळ पुरेसे नाही. ज्यांना पक्षविरहीत म्हणून जनतेने निवडून दिले ते आठच दिवसांत पत्र जाहीर करून विकून घेण्यात धन्यता मानत आहेत. ज्या पक्षाकडे १४५ आमदारांचे बहुमत आहे त्यांनी मुख्यमंत्री कोण हे ठरवावे असा या मागचा जनहिताचा उदात्त हेतू आहे.

भाजपकडे जर संख्याबळ असेल तर त्यांनी सत्तास्थापन करावी. त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, कुणीही सत्तास्थापनेचा दावा केला, तरी त्यांना बहुमत सिद्ध करावेच लागेल असा सूचक इशारा दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चां सुरू झाल्या (अर्थात त्या माध्यमांवर आहेत) ‘डा’ऊत म्हणाले, या केवळ अफवा आहेत, जर असे कुणी म्हणत असेल तर ते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे इतर प्रमुख नेते संपर्कात असल्याचेच म्हणायचेच बाकी आहे. जर असे असेल तर माझ्याही संपर्कात भाजपचे ६० आमदार आहेत. त्यांचे सकाळपासून फोन आले आहेत आणि ते सत्ता स्थापनेविषयी विचारत आहेत असेही संजयदृष्टीचे नेते सांगत आहेत मग ते काकडे असोत किंवा राउत?!

Similar News