Environmentalist Dr. Madhav Gadgil passes away : पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ डॉ. माधव गाडगीळ
देश प्रदूषणाच्या उंबरठ्यावर उभा असताना डॉ. गाडगीळ यांचं जाणं म्हणजे पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.
Environmentalist Dr. Madhav Gadgil passes away सध्या Environment पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत असताना पर्यावरणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता अखेरचा श्वास घेतला.
environment, biodiversity, ecosystems. देश प्रदूषणाच्या उंबरठ्यावर उभा असताना डॉ. गाडगीळ यांचं जाणं म्हणजे पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक प्रखर आवाज, अभ्यासू मार्गदर्शक आणि संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे. देशामध्ये सध्या विकासाच्या नावावर जंगलतोड केली जात आहे तर कुठे विकासाच्या नावावर जमिनी खोदल्या जात आहे. पर्यावरणाचा कुठलाही विचार समोर न ठेवता विकास कामाच्या आड पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचं चित्र आपल्या पाहायला मिळतेय. डॉ. गाडगीळ यांनी नेहमी पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल साधण्याची भूमिका मांडली. डॉ. माधव धनंजय गाडगीळ हे भारतातील आधुनिक पर्यावरणशास्त्राचे जनक मानले जातात. पश्चिम घाटांच्या संरक्षणासाठी आयुष्यभर काम करत राहिले, समुदायाधारित संवर्धनाचे पुरस्कर्ते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरण धोरणांना आकार देणारे हे व्यक्तिमत्त्व भारतीय पर्यावरण चळवळीतील एक मैलाचा दगड आहे. त्यांच्या निधनाने पर्यावरण क्षेत्रात एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोण आहेत डॉ. माधव गाडगीळ?
माधव गाडगीळ यांचा जन्म पुण्यात एका विद्वान कुटुंबात झाला. त्यांचे वडील धनंजय रामचंद्र गाडगीळ हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. लहानपणापासूनच निसर्गाशी जवळीक असलेल्या माधव गाडगीळांनी पुण्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजातून जीवशास्त्रात पदवी, मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून गणितीय पर्यावरणशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केली. हार्वर्डमध्ये त्यांनी माशांच्या वर्तनावर संशोधन केले, जे त्याकाळी नवीन होते.
भारतात परतल्यानंतर डॉ. गाडगीळ यांनी बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मध्ये सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्ससची स्थापना केली. १९७३ ते २००४ पर्यंत ते तेथे प्राध्यापक होते. त्यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, संरक्षण जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र आणि ऐतिहासिक पर्यावरणशास्त्र या क्षेत्रांत २५० हून अधिक शोधनिबंध लिहिले.
त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे १९८६ मध्ये भारतातील पहिला बायोस्फियर रिझर्व्ह (जैवक्षेत्र राखीव) निलगिरी बायोस्फियर रिझर्व्हची स्थापना. यामुळे तेथील समृद्ध जैवविविधतेचे संरक्षण करणे शक्य झाले. यासाठी त्यांनी पश्चिम घाटातील तीन राज्यांत प्रत्यक्ष भटकंती करून स्थानिक समुदायांशी संवाद साधला होता.
२०११ मध्ये केंद्र सरकारने नेमलेल्या Western Ghats Ecology Expert Panel वेस्टर्न घाट इकोलॉजी एक्स्पर्ट पॅनेलचे (गाडगीळ समिती) ते अध्यक्ष होते. त्यांनी पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक, समतोल आणि दूरदृष्टीपूर्ण धोरण मांडले. त्यांच्या अहवालाने पर्यावरण संरक्षणाबाबत देशभरात गंभीर चर्चा सुरू झाली. पर्यावरण संरक्षण हे केवळ शासनाचे काम नसून लोकसहभागातूनच ते यशस्वी होऊ शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
डॉ. गाडगीळ यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
पद्मश्री (१९८१)
पद्मभूषण (२००६)
शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (१९८६)
व्हॉल्वो एन्व्हायर्नमेंट प्राइझ (२००३)
टायलर प्राइझ (२०१५)
संयुक्त राष्ट्रांचा 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' जीवनगौरव पुरस्कार (२०२४)