शिंदे गटातील आमदाराचा इशारा, "अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही"

Update: 2022-07-08 13:25 GMT

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर या आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. पण आता भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर बोलताना उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणत टीका केली होती. त्यावर बुलडाण्याचे शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना संपली असे समजू नये, आम्ही सत्तेत भाजपा-शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचेवर आमची श्रद्धा नाही असा समज सोमय्या यांनी करून घेऊ नये, तसेच यापुढे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेचीही पर्वा नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमय्या यांना दिला आहे.

एकीकडे शिंदे गटातील आमदारांमध्येच मतभेद असल्याची चर्चा चिमणराव पाटील आणि गुलाबराव पटील यांच्यातील वादामुळे निर्माण झाली आहे. त्यातच आता आमदार संजय गायकवाड यांच्या या इशाऱ्यामुळे भाजपमधून उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेबद्दलही शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Similar News