Rajyasabha Election : शिवसेनेचा उमेदवार ठरला?

Update: 2022-05-24 11:34 GMT

राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी सहाव्या जागेसाठी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर सर्व पक्षांना पाठिंब्यासाठी आवाहन केले. पण ही सहावी जागा शिवसेनेची असल्याने शिवसेनेने पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची अट संभाजीराजेंना घातली. हा प्रस्ताव त्यांनी नाकारला आहे, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कोण, अशी चर्चा सुरू झाली होती. पण आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. शिवसेनेतर्फे मात्र यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना याबद्दल विचारले असता, शिवसेना दोन उमेदवार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, याची माहिती स्वत: उद्धव ठाकरे देतील असेही त्यांनी सांगितले आहे. पण संजय पवार यांच्या नावाची चर्चा मात्र जोरात आहे.

दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घातली आहे. पण या अटीवर आता मराठा क्रांती मोर्चा, छावा संघटना यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने या आधी प्रितिश नंदी, राजकुमार धुत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, एकनाथ ठाकूर, भरतकुमार राऊत यांना खासदारकी देताना शिवसेनेत प्रवेशाची अट घातली होती का, असा सवाल छावा संघटनेने उपस्थित केला आहे.

एवढेच नाही तर 42 मतांच्या आकड्यांची जुळवाजुळव झाली असून केवळ 5-6 मते कमी असल्याचा दावा संभाजीराजे समर्थक करत आहे. तर दुसरीकडे शिवसेना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला नाही तर छावा संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या अटीनंचर संभाजीराजे यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे येत्या काळात राज्यसभा निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे, हे मात्र निश्चित....

Tags:    

Similar News