देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील एका गंभीर प्रकरणाच्या चौकशीला राज्य सरकारने सुरुवात केली आहे.

Update: 2021-07-10 01:57 GMT

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंगचा मुद्दा गाजला होता. याप्रकरणी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली होती. त्यानुसार आता फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती संपूर्ण चौकशी करून तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. समितीमध्ये पोलीस महासंचालक यांच्यासह राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त आणि मुंबई विशेष शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सदस्य म्हणून काम करणार आहेत.

पावसाळी अधिवेशनादरम्यान माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपींगचा मुद्दा उपस्थित केला होता. सदर मुद्द्याच्या अनुषंगाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे व दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु, असे आश्वासन दिले होते.

२०१५ ते २०१९ या ५ वर्षांच्या काळातील फोन टॅपींग प्रकरणांची पडताळणी करुन त्या काळात राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपध्दतीने टॅप करण्यात आले आहेत का? याचा तपास ही समिती करणार आहे. तसेच हा प्रकार खरा असल्याचे आढळल्यास दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची काम समिती करणार आहे,
अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News